उद्धव ठाकरे 'ॲक्शन मोड'वर: पक्षात नेते, उपनेत्यांवर स्वतंत्र भार; मंगळवारच्या बैठकीत शिक्कामोर्तब?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 05:49 IST2025-04-06T05:48:51+5:302025-04-06T05:49:11+5:30
मंगळवारी होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता सूत्रांनी 'लोकमत'कडे वर्तवली.

उद्धव ठाकरे 'ॲक्शन मोड'वर: पक्षात नेते, उपनेत्यांवर स्वतंत्र भार; मंगळवारच्या बैठकीत शिक्कामोर्तब?
महेश पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उद्धवसेनेने नेते आणि उपनेत्यांवर महापालिकांची स्वतंत्र जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या चार जिल्ह्यांतील विधानसभानिहाय वॉर्डाची जबाबदारी उपनेत्यांवर देण्यात येणार आहे. मंगळवारी होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता सूत्रांनी 'लोकमत'कडे वर्तवली.
पक्षगळती रोखण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेते, उपनेत्यांची दर मंगळवारी शिवसेना भवनात बैठक घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सुभाष देसाई, दिवाकर रावते, अनंत गिते, चंद्रकांत खैरे हे उपनेत्यांची बैठक घेत आहेत. गेल्या मंगळवारच्या बैठकीत उपनेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. उपनेत्यांना महत्त्व दिले जात नाही. बैठकांना बोलावले जात नाही. त्यामुळे या पदाला महत्त्व आहे की नाही? असा उद्वेग त्यांनी व्यक्त केला होता.
वेगळ्या कल्पना सूचवा
पक्ष वाढीसाठी तुम्ही काय करता? प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक कामाला माणूस अशी पक्षपद्धत आहे. पदाचा वापर करा, वेगळ्या कल्पना सुचवा, असे नेत्यांनी उपनेत्यांना सांगितले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
विशेष लक्ष...
महापालिकेत सध्या प्रशासकराज सुरू आहे. त्यामुळे कारभारावर विशेष लक्ष ठेवण्यासाठीची योजना तयार होत आहे. महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी उपनेत्यांना जबाबदारी दिलेल्या विभागाचा अहवाल पक्षप्रमुखांना द्यावा लागणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.