Uddhav Thackeray on Amit Shah: शिवसेनेचे नाव-चिन्ह गेल्यामुळे 'मोगॅम्बो' खूश झाला, उद्धव ठाकरेंचा अमित शहांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 06:55 PM2023-02-19T18:55:22+5:302023-02-19T19:01:28+5:30
Uddhav Thackeray on Amit Shah: 'शिवसैनिकांनी घाम गाळून त्यांना मोठ केले, तेच आज मालक बनायला बघताहेत. माझे वडील हवेत पण मुलगा नको, मी काय वाईट केल तुमच्यासोबत?'
Uddhav Thackeray on Amit Shah: निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत मोठा निकाल दिला. या निकालाने उद्धव ठाकरे आणि ठाकरे समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. या निर्णयानंतर शिंदे गट आणि भाजपकडून विविध प्रतिक्रिया आल्या. त्यावरुन आता स्वतः उद्धव ठाकरेंनी (uddhav thackeray) भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, 'काल अमित शहा पुण्यात आले होते, त्यांनी विचारलं महाराष्ट्रात कसं काय सुरू आहे. त्यानंतर ते म्हणाले आज खूपच चांगला दिवस आहे. कारण शिवसेनेचे नाव आणि चिन्ह आपल्यासोबत आहे. मोगॅम्बो खुश हुआ,' अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसेच, 'मिस्टर इंडिया चित्रपट आठवला तर त्यात मोगॅम्बोला हेच हवे होते. देशात आपापसात लढाई व्हावी, लोक आपसात लढत राहिले, तर मी राज्य करेन. आजचे मोगॅम्बो हेच तर आहेत,' अशी टीकाही ठाकरेंनी केली.
उद्धव ठाकरे पुढे म्हणतात, 'काल मोगॅम्बो म्हणाले आम्ही पाय चाटले, गद्दार त्यांचे काय चाटताहेत माहिती नाही. बोहरा समाजाने बोलावले मी गेलो, दिखावा नाही केला, पोळ्या नाही लाटल्या. मला प्रेमाने बोलावले, मी गेलो कारण आमचे जुने संबंध आहेत. मुफ्ती मोहम्मद सोबत गेले तेव्हा कुठे गेले होते हिंदुत्व. ज्यांना जायचे ते जाऊ शकतात, पण त्यांनी इतर पक्षात जायला हवे होते. शिवसैनिकांनी घाम गाळून त्यांना मोठ केले, तेच आज मालक बनायला बघताहेत. माझे वडील हवेत पण मुलगा नको, मी काय वाईट केल तुमच्यासोबत?' असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी केली
तसेच, 'मी भाजपला मुख्यमंत्री पद मागितले. मला मुख्यमंत्री व्हायचेच नव्हते पण पवार साहेब म्हणाले. भाजपने अडीच वर्षांचे वचन पूर्ण केले असते तर आज हे सगळ करायची गरज नव्हती. मी काँग्रेससोबत गेलो नाही, तर भाजपने मला ढकललं आहे. मला हे यासाठी सांगायचं आहे की, तुमच्या मनात कोणताही गैरसमज राहू नये. 2014 मध्ये मी युती तोडली नव्हती, भाजपने युती तोडली होती. तेव्हाही मी हिंदू होतो, आजही मी हिंदू आहे. त्यावेळी तुम्ही युती तोडली, नंतर शेवटी त्यांना आमची गरज लागली. भाजपला वाटलं होतं ते स्वतःच्या दमावर सत्ता सांभाळतील, मात्र त्यांना ते जमलं नाही, शेवटी आमची मदत घ्यावी लागली,' असा टोलाही त्यांनी लगावला.