मुंबई - राज्यात शिवसेना आमदारांचा एक मोठा गट फुटून वेगळा झाल्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून मोठा सत्ता संघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे कट्टर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल ४२ आमदारांनी बंड पुकारलं आहे. आता, हा वाद न्यायालयात पोहोचला आहे. त्यातच, आज शिंदेगटाने 'शिवसेना बाळासाहेब' असं नाव आपल्या गटाला दिल्याने वाद अधिकच तीव्र झाला आहे. तर, दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत 6 महत्त्वाचे ठराव करण्यात आले आहेत.
शिवसेना कार्यकारिणीच्या बैठकीत झालेल्या 6 नंबरच्या ठरावात शिंदे गटाच्या शिवसेना बाळासाहेब या नावाला आक्षेप घेण्यात आला आहे. कार्यकारिणीच्या ठराव क्रमांक 6 मध्ये आम्ही स्पष्टपणे सांगितलं आहे की, इतर कोणत्याही संघटनेला शिवसेना हे नाव वापरता येणार नाही. कोणताही बेईमान, कोणताही गद्दार हे नाव वापरुन आपलं राजकारण, आपला स्वार्थ साधू शकत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वात महत्त्वाचा मुद्दा मांडला की, जर तुम्हाला मतं मांडायची आहेत, तर तुमच्या बापाच्या नावाने मांडा, शिवसेनेच्या बापाच्या नावाने नको, असेही राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
घडामोडींकडे देशाचे लक्ष, दिल्लीतही खलबतं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे देखील पक्ष संघटना टिकवून ठेवण्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊ लागले आहेत. बंड पुकारलेले एकनाथ शिंदे हॉटेलमधून बाहेर पडले होते, मात्र काही तासांनी ते पुन्हा हॉटेलमध्येच पोहोचेल. तर, दुसरीकडे भाजपा नेत्यांकडूनही दिल्लीत सध्याच्या परिस्थितीवर खलबतं सुरू आहेत. त्यामुळे राज्यात सत्तापालट पाहायला मिळणार की महाविकास आघाडीचच सरकार कायम राहणार हे पाहण्यासाठी आता काही काळ वाट पाहावी लागणार आहे.