Join us

“आजपासूनच निवडणुकीच्या कामाला लागा, गाफील राहू नका”; उद्धव ठाकरेंचे नेत्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 2:24 PM

Uddhav Thackeray News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Uddhav Thackeray News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. तसेच जागावाटपाबाबत चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळाले नसले तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आगामी निवडणुकांसाठी जय्यत तयारी केली जात आहे. राज्यातील विविध ठिकाणचे नेते, पदाधिकारी यांच्या बैठका मातोश्रीवर सुरू आहेत. यातच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. 

उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर कोकणातील नेत्यांची तातडीची बैठक घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. या बैठकीत जवळपास दोन तास चर्चा करण्यात आली. आजपासूनच निवडणुकीच्या कामाला लागा. गाफील राहू नका, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिल्याचे समजते. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगडची जागा उद्धव ठाकरे गट लढवणार असल्याची चर्चा आहे. या जागा शिवसेनेच्यादृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. त्यासाठी आतापासूनच ठाकरे गटाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. 

उद्धव ठाकरे यांनी बैठकीला आलेल्या नेत्यांशी संवाद साधला

उद्धव ठाकरे यांनी या बैठकीला आलेल्या नेत्यांशी संवाद साधला. तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यात आले. याशिवाय विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानेही मार्गदर्शन करण्यात आले. लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा. निवडणुकीचे नियोजन करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांचे दौरे कोकणात होणार आहेत. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मातोश्रीवरील बैठकीला खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, राजन विचारे, अनिल परब, रवींद्र वायकर, सुभाष देसाई, भास्कर जाधव, अनंत गीते आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेना