"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 06:55 PM2024-11-07T18:55:03+5:302024-11-07T19:00:00+5:30

मुंबईच्या सुनियोजित विकासाला उद्धव ठाकरे विरोध करत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.

Uddhav Thackeray ploy to swallow 37 acres of land by re tendering Dharavi Says Ashish Shelar | "धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप

"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप

Maharashtra Assembly Election 2024: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी  पक्षाचा जाहीरनामा जाहीर केला. या जाहीरनाम्यात विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर करणे आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करण्याची ग्वाही देण्यात आली. यातल्या धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करण्याच्या आश्वासनावरुन भाजप आक्रमक झाली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाची पुनर्निविदा काढून ३७ एकरचा भूखंड गिळंकृत करण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव असल्याचा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांनी जाहीरनाम्यातून मोठी घोषणा केली आहे. या प्रकल्पाचा मुंबईवर परिणाम होणार असल्याने तो रद्द केला जाईल. झपाट्याने होणारे नागरीकरण लक्षात घेऊन महाराष्ट्र आणि मुंबईतही गृहनिर्माण धोरण असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबईच्या सुनियोजित विकासाला ठाकरेंचा विरोध

"धारावी पुनर्विकास प्रकल्पाची पुनर्निविदा काढून ३७ एकरचा भूखंड गिळंकृत करण्याचा उबाठाचा डाव आहे. उद्धव ठाकरेंच्या द्वितीय पुत्राच्या वनस्पती आणि प्राणीप्रेमासाठी हे षडयंत्र रचले जात आहे. आशियातील सगळ्यात मोठ्या झोपडपट्टीत मरणयातना भोगणाऱ्या गोरगरीबांना चांगली घरे मिळताहेत, हे त्यांना बघवत नाही. त्यामुळेच मुंबईच्या सुनियोजित विकासाला ते विरोध करत आहेत. धारावीचा पुनर्विकासाचा उल्लेख आघाडीच्या पंचसूत्रीत नाही. पण उद्धव ठाकरे यांनी वचननामा जाहीर करून धारावीबाबत भूमिका मांडली. म्हणजे ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे का? ती आघाडीची भूमिका नाही का? याचे स्पष्टीकरण ठाकरेंनी द्यावे. कुणीतरी स्क्रीप्ट लिहून दिली आणि ते बोलले," असा आरोप आशिष शेलार यांनी केला.

अदानीला जागा दिल्याचा मुद्दा कुठून आणला?

"अदानीला जागा देण्याचे सरकारी निर्णय म्हणजे फेक नेरेटिव्ह आहे का? हे उद्धव ठाकरे यांचे वाक्य म्हणजे फेकमफाक आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत 'डीआरपी' अर्थात धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टला जागा देण्याचे ठरले. ही संस्था १०० टक्के सरकारच्या मालकीची आहे. मग अदानीला जागा दिल्याचा मुद्दा कुठून आणला? सातबारावर अदानीचे लावले किंवा तसा प्रस्ताव तयार केल्याचा एकतरी पुरावा उद्धव ठाकरेंनी द्यावा. पण, ते देऊ शकणार नाहीत. कारण ते फेकमफाक करीत आहेत," असं शेलारांनी म्हटलं.

"मुळात धारावीच्या पुनर्विकासाला अतिरिक्त जागा द्यायला लागली तर द्यावी, असे प्रावधान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असतानाच केले होते. फेकमफाक करण्यापेक्षा त्यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे. देवनार कचराभूमीच्या ठिकाणी प्रक्रिया करून तयार होणारी जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्यास तुमचा विरोध का? धारावीत आम्ही आंतरराष्ट्रीय वित्तीय पार्क उभारणार असल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला. असे आंतरराष्ट्रीय ठराव आणायला आधी केंद्र सरकारचा ठराव लागतो. अद्याप तुम्ही राज्यातील सत्तेपासून कोसो दूर आहात, मग जे तुमच्या अखत्यारित नाही, त्याबद्दल का बोलता? त्यामुळे धारावी पुनर्विकासाच्या बाबतीत दिलेले आश्वासन म्हणजे लबाडा घरचे जेवण आहे," असेही आशिष शेलार म्हणाले.
 

Web Title: Uddhav Thackeray ploy to swallow 37 acres of land by re tendering Dharavi Says Ashish Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.