मुंबईः शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांनी आज उमेदवारी अर्जसुद्धा दाखल केला आहे. अर्ज दाखल करताना निवडणूक कार्यालयात उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे आणि सुनील शिंदेसुद्धा उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करताना पदयात्रा काढत शिवसेनेनं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत जनतेचं आभार मानले आहेत.आदित्यच्या उमेदवारी अर्जावर ते म्हणाले, मी सर्व शिवसैनिकांना आणि जनतेला धन्यवाद देतो, त्याचप्रमाणे कट्टर शिवसैनिक सुनील शिंदे यांना धन्यवाद देतो. इथल्या जनतेनं आणि तमाम शिवसैनिकांनी आनंदानं आदित्याचा स्वीकार केला, त्याबद्दल मी काय सांगू, आम्ही जनतेचे ऋणी आहोत. मला आनंद आणि समाधान आहे. आजपर्यंत आमच्या घराण्याची जी समाजसेवेची परंपरा आहे. ती पुढच्या पिढीतही कायम राहिलेली आहे. माझ्यापर्यंत निवडणूक न लढवण्याचा निर्णय आमच्या कुटुंबाचा आणि घराण्याचा होता. पण आता नवीन पिढी आलेली आहे. त्या नवीन पिढीचे विचारसुद्धा तरुण आहेत. तरुणांच्या विचारानंच देश आणि राज्य पुढे जावं ही जनतेची इच्छा आहे. त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. तसेच जे जे या निवडणुकीसाठी आदित्यला आशीर्वाद देत आहेत, त्यांचे आम्ही ऋणी आहोत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंचे आभार व्यक्त केले आहेत. पुढे ते म्हणाले, खरंच मनापासून सांगतो, आदित्यवर प्रेम करणाऱ्या जनतेला मी हात जोडून नमस्कार करतो.
दरम्यान, ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरत असून, मनसेनं जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीतही राज ठाकरेंनी वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे राज ठाकरे वरळीत मनसेचा उमेदवार न देऊन आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्षरीत्या मदत करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हयातील एकही निवडणूक लढवली नव्हती. परंतु महाराष्ट्राचा रिमोट कंट्रोल कायम त्यांच्या हातात असे. परंतु कालपरत्वे सगळंच बदलत गेलं, आता ठाकरे घराण्यातील चौथ्या पिढीतील व्यक्ती सक्रिय राजकारणात प्रवेश करत आहे. युवासेनेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी राजकारणाला सुरुवात केली अन् अल्पावधीतच त्यांनी स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलं. ठाकरे घराण्यात किती मतभेद असले तरी कठीण प्रसंगात ते एकत्र येत असल्याचं वेळोवेळी पाहायला मिळालं आहे. उद्धव ठाकरे आजारी असताना राज ठाकरेंनी लीलावती रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली होती. उद्धव ठाकरेंवर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरेंनी स्वतः गाडी चालवून उद्धव यांना मातोश्रीवर नेले होते. तसेच राज ठाकरेंच्या मुलाच्या लग्नाच्या वेळीसुद्धा उद्धव ठाकरेंच्या कुटुंबीयांनी उपस्थिती दर्शवली होती. राज ठाकरेंवर कोहिनूर मिल प्रकरणात ईडीकडून करण्यात आलेल्या चौकशीच्या वेळीही उद्धव ठाकरेंनी चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही, असं म्हटलं होतं. राज ठाकरेंनी मनसेच्या दुसऱ्या यादीतही वरळीतून उमेदवार न दिल्यानं आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्षरीत्या मदत करणार असल्याचीच चर्चा आहे.