- उद्धव ठाकरे(मुख्यमंत्री) महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि नागपूरच्या पहिल्याच विधिमंडळ अधिवेशनात मी म्हटले की, माझे सरकार संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीनुसार काम करेल. आज दोन वर्षे झाली आहेत, आम्ही या दशसूत्रीनुसार सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून काम करतो आहोत. विविध संकटे येऊनही राज्याची कामगिरी चांगली राहिली. जनतेनेही आम्हाला सहकार्य केले, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे असे मी समजतो.
सत्तेवर आल्यानंतर चार एक महिन्यातच कोविडच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. नियोजनबद्ध पावले टाकून या साथीला रोखण्यात यश मिळविले. आपण देशात पहिल्यांदाच तज्ज्ञ डॉक्टर्सचे राज्यस्तरीय आणि इतरत्र जिल्हास्तरीय व मुलांसाठी स्वतंत्र टास्क फोर्स निर्माण केले.सत्तेवर आल्यानंतर महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली आणि २० हजार कोटींपेक्षा जास्त कर्जमाफी करून दाखवली. उद्योग-गुंतवणूक, शेती, पायाभूत सुविधा, सर्वसामान्यांना घरे, रोजगार, पाणीपुरवठा, सौर ऊर्जा, पर्यावरण, पर्यटन, वने अशा प्रत्येक विभागाने नवनवीन योजना राबवल्या. आरोग्य सुविधा वाढविल्या. ऑक्सिजन निर्मिती, लसीकरण, जम्बो सेंटर्सची उभारणी यात राज्याने देशात उदाहरण निर्माण केले. इलेक्ट्रिक वाहन धोरणाची घोषणा आणि त्याची अंमलबजावणी ही महत्त्वाची उपलब्धी आहे. पर्यटन व्यवसायात रोजगाराच्या संधी निर्माण केल्या. सुविधा वाढवून या क्षेत्रातील लोकांना प्रोत्साहन दिले. पर्यटनास उद्योगाचा दर्जा दिला, परवान्यांची अनावश्यक संख्या कमी केली. गेल्यावर्षी सुमारे दोन लाख तरुणांना रोजगार दिला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गही लवकरच खुला करणार आहोत.
राज्यात विविध शहरांना हवाई सेवेने जोडण्याचे नियोजन आहे. मुंबईसारख्या महानगरात कोस्टल रोड, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक व इतर मार्ग यामुळे मुंबई, ठाणे तसेच संपूर्ण महानगराच्या दळणवळण इतिहासात क्रांती येईल. वन्यजिवांच्या भ्रमण आणि अधिवासासाठी ११ नवीन संवर्धन राखीव क्षेत्रे केली. शेतकऱ्यांकडे सौर कृषिपंप पोहोचावे यासाठी जाळे विणण्याचे काम सुरू आहे. महसूल विभागाने महाराजस्व अभियानाची व्याप्ती वाढवली आहे. स्कॉटलंड परिषदेत महाराष्ट्राला ‘इन्स्पायरिंग रिजनल लिडरशिप’ (प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्व) पुरस्कार मिळाला. महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षणात सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.
ग्रामीण भागातल्या प्रत्येक घरात पिण्याचं पाणी नळाने यावे यासाठीची योजना राबविली जात आहे. कोविड काळात वेगवेगळ्या श्रमिक, कामगारांना अर्थसहाय्य, पालक गमावलेल्या तसेच निराधार महिलांना आधार, दुर्बल व शोषित घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच इतर लाभ असा मदतीचा हात पुढे केला.
महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेत दोन वर्षांत सुमारे साडेचौदा लाख मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात आल्या आणि २६०० कोटी रुपये रुग्णालयांना दिले. राज्याची जलसंपदा वाढविण्यासाठी नियोजनबद्ध रीतीनं प्रकल्पांची उभारणी सुरू केली आहे. दोन लाख हेक्टर्सची सिंचन क्षमता निर्माण केली आहे. गडकिल्ले संवर्धन, प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार अशा बाबतीतही शासन पावले टाकत आहे. विविध संकटं येऊनही राज्याची कामगिरी चांगली राहिली. याचं श्रेय माझे सहकारी, प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी व जनतेचं आहे. शासन आणि प्रशासनात कुठंही नकारात्मकता नव्हती. कोविडला रोखण्यात यश मिळविले असले तरी आम्ही आत्मसंतुष्ट नाही. पुढच्या काळासाठी कायमस्वरूपी सुविधांवर भर देण्याला प्राधान्य आहे.