मुंबई - परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे आजपासून औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानाचा आढावा घेऊन त्यांना शासकीय मदत तातडीने मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलं होतं. त्यानुसार, उद्धव ठाकरे दुपारी १ वाजत औरंगाबाद विमानतळावर पोहोचले. यावेळी, त्यांचं जल्लोषात स्वागतही करण्यात आलं. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावरुन आता राजकीय टीका टिपण्णी सुरू आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी २० मिनिटांचा दौरा म्हणत टीका केली. तर, शरद पवारांनी या दौऱ्याचं समर्थन केलं आहे.
औरंगाबादेत येताच उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले, त्यावेळी, शेतकऱ्यांनी ठाकरेंसमोर आपली व्यथा मांडली. तसेच, शेतकऱ्यांनो, धीर सोडू नका, मी तुमच्यासोबत आहे, असे म्हणत त्यांच्यात विश्वास बांधण्याचा प्रयत्नही केला. तत्पूर्वी शिवसेना आणि शिंदे गटामध्ये या दौऱ्यावरुन वाद रंगला आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका केली असता, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सत्तार यांच्यावर जोरदार प्रहार केला. मात्र, शरद पवार यांनी या दौऱ्याचं एकप्रकारे समर्थन केलं असून शेतकऱ्यांना लाभ मिळावा, अशी इच्छाही व्यक्त केली आहे.
उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला उशीर झाला का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. त्यावर, शरद पवार यांनी उत्तर दिलं. त्यांची तब्येत ठीक नव्हती गेले काही दिवस. जशी त्यांची तब्ब्येत सुधारतेय, तसं ते बाहेर पडत आहेत. लोकांचं सुख दुख पाहायला कोणीही जात असेल तर त्यात शंका घेण्याचं कारण नाही. त्यांनी ते बघावं, त्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकारला काही सूचना कराव्यात, त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला तर माझ्यामते ही चांगली गोष्ट आहे, असे शरद पवार यांनी म्हटले. दरम्यान, औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबातील चिमुकल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्या शेतकरी कुटुंबीयांसही उद्धव ठाकरे भेट घेऊन मदत करणार असल्याचे समजते.
खैरेंचा अब्दुल सत्तारांवर पलटवार
अब्दुल सत्तारसारखा माणूस ज्याने उद्धव ठाकरेंच्या हाताखाली काम केले ते आता त्यांच्यावर टीका करत आहेत. ४ पक्ष फिरून आले. त्यांचा बंदोबस्त आम्ही करू. आदित्य ठाकरे फिरलेत, आमदार, खासदार फिरले, मविआ नेते, विरोधी पक्षनेते राज्यभर फिरले. कितीही काय झालं तरी आता बस्स झालं. तोंड सांभाळा नाहीतर आम्ही कायदा दाखवून देऊ असा इशारा त्यांनी अब्दुल सत्तार यांना दिला आहे.