“असे दिवस येतील की राज्यात नाही फक्त केंद्रात निवडणुका होतील”: उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 03:31 PM2023-05-24T15:31:25+5:302023-05-24T15:33:03+5:30
Uddhav Thackeray: अरविंद केजरीवाल यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
Uddhav Thackeray: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही केंद्र सरकारने त्याविरोधातील अध्यादेश काढला आहे. यासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. यातच अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाविरोधात देशभरातील विरोधी पक्ष एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वच विरोधी पक्षांकडून तशी अपेक्षाही बोलून दाखवली जात आहे. याचाच एक भाग म्हणून अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यानंतर मीडियाशी बोलताना उद्धव ठाकरेंनी एक गंभीर शक्यता वर्तवताना भीती व्यक्त केली आहे.
असे दिवस येतील की राज्यात नाही फक्त केंद्रात निवडणुका होतील
गेल्या काही दिवसांत सर्वोच्च न्यायालयाने दोन निकाल दिले आहेत. एक शिवसेनेच्या बाबतीत आणि दुसरा दिल्लीच्या बाबतीत. लोकशाहीत लोकप्रतिनिधींचे सर्वांत जास्त महत्त्व असते. दिल्ली सरकार आणि ‘आप’च्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय लोकशाहीसाठी आवश्यक होता. पण त्याविरोधात केंद्र सरकारने अध्यादेश काढला. आता असे दिवस येतील की, राज्यांमध्ये निवडणुका होणारच नाहीत. फक्त केंद्रात निवडणुका होतील. त्यातही २०२४ च्या निवडणुकांमध्ये जनता काय निर्णय देते, त्यावर बरेच काही अवलंबून असेल, असे सांगत उद्धव ठाकरेंनी चिंता व्यक्त केली.
दरम्यान, आपचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल गेल्या काही दिवसांत दुसऱ्यांदा मातोश्रीवर आलेत. नाते जपण्यासाठी शिवसेना आणि मातोश्री प्रसिद्ध आहे. काही लोक फक्त राजकारण करतात. आम्ही मात्र राजकारणाच्या पलीकडे जाऊन नाते जपत असतो. राजकारण आपल्या जागी असते. येणारे वर्ष निवडणुकीचे आहे. यावेळी ट्रेन सुटली, तर आपल्या देशातून लोकशाही गायब होईल. लोकशाहीला वाचवण्यासाठी देशातून जे लोकशाही हटवू इच्छितात, त्यांनाच मी विरोधी पक्ष म्हणेन, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेतली होती.