Shivsena Abhishek Ghosalkar Murder Case ( Marathi News ) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबईतील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेतून वेगळीच शंका उपस्थित केली. "मॉरिस यानेच अभिषेक घोसाळकरवर गोळ्या चालवल्या की आणखी कुणी चालवल्या? त्या दोघांनाही मारण्याची सुपारी दुसऱ्या कुणी दिली होती का?" असा प्रश्न उद्धव यांनी उपस्थित केल्याने या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. त्यातच आता अभिषेक घोसाळकर यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आला असून त्यातून नवी माहिती उघड झाली आहे.
अभिषेक घोसाळकर यांना तीन गोळ्या लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं याआधी सांगितलं जात होतं. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या शरीरात चार गोळ्या घुसल्या होत्या, असं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून स्पष्ट झालं आहे. त्यानंतर अतिरक्तस्त्राव आणि हॅमरेज शॉक यामुळे घोसाळकर यांचा मृत्यू झाल्याचं जे. जे. रुग्णालयातील पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरेंनी कोणती शंका बोलून दाखवली?
राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. तसंच अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येबद्दल बोलताना ते म्हणाले की, "अभिषेक घोसाळकरवर गोळ्या मॉरिसने चालवल्या की आणखी कुणी चालवल्या? त्या दोघांनाही मारण्याची सुपारी आणखी कुणी दिली होती का? कारण ज्याने हत्या केली त्यानेही नंतर आत्महत्या केली. हे प्रकरण जेवढं दिसतंय तेवढं सोपं नाही. सूड भावनेतून माणूस अत्यंत टोकाचं पाऊल उचलतो. त्याने हत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं असेल तर त्याने आत्महत्या का केली हा प्रश्न राहतो," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
घटनास्थळी नेमकं काय घडलं होतं?
फेसबुक लाइव्हदरम्यान अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस दोघेच कार्यालयात होते. मॉरिसने ट्रायपॉड लावून फेसबुक लाइव्ह सुरू केले. त्यानंतर दोन ते तीनदा उठून कॅमेऱ्याच्या बाजूला झाला. चार मिनिटांनंतर बंदुकीने पाच गोळ्या घोसाळकर यांच्या दिशेने झाडल्या. यापैकी चार गोळ्या त्यांना लागल्या. गोळ्यांच्या आवाजाने नागरिकांची पळापळ झाली. गोळीबारानंतर मॉरिसने दरवाजाकडे धाव घेतली. बाहेरच्या सीसीटीव्हीमध्ये मॉरिस दोन ते तीन सेकंद घोसाळकरांना पाहत असल्याचं दिसत आहे. त्यानंतर हातातील बंदुकीने मॉरिस स्वतःवर गोळी झाडण्याचा प्रयत्न करतो. मात्र, बंदुकीतील गोळ्या संपल्याने तो पोटमाळ्यावर धावला. नंतर त्याने तिथे स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्याचं सांगितलं जात आहे.