मुंबई : जागावाटपावरून सध्या महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "आमच्या महाविकास आघाडीमध्ये जागावाटप सुरळीत होईल. याबाबतीत आमची बैठक होईल. वंचितसोबत आमची बोलणी सुरु आहेत. मविआ आणि वंचित अशी संयुक्त बैठक करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही. कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांशी जोपर्यंत आम्ही बोलत नाही, तोपर्यंत आमच्यापैकी कुणीही यावर काही बोलणार नाही," अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे.
"वंचित बहुजन आघाडीसोबत आमची बोलणी सुरू आहेत. पुढील दोन दिवसांमध्ये संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे दोन नेते आणि वंचितचे नेते एकत्र बैठक घेतील. वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि मी प्रत्यक्ष भेटल्यानंतर जागावाटपावर चर्चा करू," असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच वंचितकडून होत असल्याच्या १२ जागांच्या मागणीवरही उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा फॉर्म्युला अद्याप माझ्यासमोर आलेला नाही, असं ते म्हणाले.
दरम्यान, "देश वाचला पाहिजे, लोकशाही वाचली पाहिजे. यासाठी सर्वजण एकत्र आले आहेत. कोणी कितीही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तरी फरक पडत नाही," असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी कोणता फॉर्म्युला मांडला?
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी नुकतंच जागावाटपाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे आंबेडकर यांनी चारही पक्षांनी लोकसभेच्या प्रत्येकी १२ जागा लढवाव्यात, असा प्रस्ताव मांडला आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामावून घेतलं जातं का आणि वंचितने मांडलेल्या समसमान जागांच्या प्रस्तावाला कसा प्रतिसाद दिला जातो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.