लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 10:56 PM2024-11-22T22:56:37+5:302024-11-22T22:58:56+5:30

Uddhav Thackeray Reaction On Adani Group Allegations In America: या घोटाळ्याबाजाचे काय करणार? हा प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

uddhav thackeray reaction over allegations on gautam adani for bribery case in america court | लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”

लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”

Uddhav Thackeray Reaction On Adani Group Allegations In America: वाढीव दराने सौरऊर्जेची कंत्राटे मिळविण्यासाठी भारतातील काही राज्य सरकारांच्या अधिकाऱ्यांना २५० दशलक्ष डॉलरची (२,१०० कोटी रुपये) लाच दिल्याच्या आरोपावरून अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांच्याविरुद्ध अमेरिकेच्या न्यायिक विभागाने खटला दाखल केला. न्यूयॉर्क न्यायालयात गौतम अदानी यांच्यासह ७ जणांविरुद्ध ‘यूएस सेक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन’ने दोन खटले दाखल केले आहेत. यावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. 

अमेरिकेत दाखल खटल्याप्रकरणी अदानी समूहाने एक निवेदन जारी केले असून, आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. समूहावरील सर्व आरोप निराधार असून, आम्ही कायदे पालन करणारी संस्था आहोत, असे या निवेदनात म्हटले आहे. खटल्याचे वृत्त आल्यानंतर जारी निवेदनात समूहाने म्हटले की, भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याबाबतचे आपल्यावरील आरोप पूर्णत: निराधार असून, आम्ही या प्रकरणी सर्व प्रकारच्या कायदेशीर मार्गांचा वापर करू. समूहाच्या प्रवक्त्याने निवेदनात म्हटले की, अमेरिकी न्यायिक विभागाने स्वत:च म्हटल्यानुसार, हे केवळ आरोप आहेत. जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत बचाव पक्ष निर्दोषच असतो. आमचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी सर्व प्रकारच्या कायदेशीर साधनांचा वापर केला जाईल. यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी टीका केली आहे. 

एवढ्या मोठ्या प्रमाणात घोटाळा कसा होऊ शकतो

आता बॉम्ब फुटला तोच बॉम्ब चार दिवस आधी फुटला असता तर त्याचा स्फोट मोठा झाला असता. १९ तारखेला एक बॉम्ब फुटलेला आहेच. नोटांचा बॉम्ब जो काही वसई-विरारला फुटला तो लोकांनी पाहिलेला आहे. पण आता जो बॉम्ब फुटला त्याने संपूर्ण जग हादरले. एवढ्या मोठ्या प्रमाणात घोटाळा कसा होऊ शकतो. मात्र, या घोटाळ्याबाजाचे काय करणार? हा प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि गौतम अदानींवर केली. 

दरम्यान, निकालापूर्वी माहीम मतदारसंघात भाजपाला मोठा धक्का बसला. भाजपाचे सचिव सचिन शिंदे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. याबाबत बोलताना, सचिन शिंदे यांचे स्वागत करतो. आता तुमच्यावर अन्याय होता कामा नये. आणि न्याय मिळाला पाहिजे. मी शब्द देतो की तुम्हाला पश्चाताप होणार नाही. मात्र, आपण जनतेला काय देऊ शकलो हे फार महत्त्वाचे असते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
 

Web Title: uddhav thackeray reaction over allegations on gautam adani for bribery case in america court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.