Uddhav Thackeray News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे दुसऱ्या टप्प्यासाठीच्या मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून, प्रचाराला आणखी वेग आला आहे. यातच ठाकरे गटाचे निष्ठावान आणि उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय मानले जाणारे मिलिंद नार्वेकर यांना शिवसेना शिंदे गटाकडून ऑफर मिळाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावरून दावे-प्रतिदावे सुरू असून, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मिलिंद नार्वेकर यांच्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांवर प्रश्न विचारण्यात आला होता.
मिलिंद नार्वेकर ठाकरे गट सोडू शकतात. तसेच मिलिंद नार्वेकर यांना शिवसेना शिंदे गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात येण्यासाठी उत्सुक आहेत. काही नेते, आमदारही येण्यासाठी इच्छुक आहेत. आता इंनकमिंग सुरू असताना मिलिंद नार्वेकर यांचे नाव समजले. ते येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. मात्र अधिकृत संपर्क झालेला नाही. आम्ही संर्पक केला नाही, असे शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरे यांनी म्हटले आहे. यानंतर पत्रकार परिषदेत मिलिंद नार्वेकर यांना मिळालेल्या ऑफर संदर्भात उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी प्रश्न केला.
उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
ठाकरे गटाने काही दिवसांपूर्वी एक प्रचारगीत प्रसिद्ध केले. मात्र, यावरून ठाकरे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस बजावली. ठाकरे गटाच्या प्रचारगीतामध्ये ‘जय भवानी, जय शिवाजी’, असा नारा देण्यात आला आहे. यातील ‘जय भवानी’ शब्दावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला असून हा शब्दा काढून टाकण्यात यावा, असे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकारांनी मिलिंद नार्वेकर यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता, निवडणूक आयोगाची नोटीस महत्त्वाचा प्रश्न आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यावर मौन बाळगले आणि काहीच उत्तर दिले नाही.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही यापूर्वी देव-धर्माचा उल्लेख करून मतांचा जोगवा मागितला आहे. त्यामुळे आयोगाने आधी त्यांच्यावर कारवाई करावी, मगच आम्हाला नोटीस पाठवावी. कायदेशीर लढाईला सामोरे जाण्यासही आम्ही तयार आहोत, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली. हा विषय मांडून उद्धव ठाकरे पत्रकार परिषद संपवत असताना पत्रकारांनी विविध राजकीय विषयांबाबत त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उद्धव ठाकरे यांनी इतर प्रश्नांना बगल देत हाच आजचा महत्त्वाचा प्रश्न असल्याचे सांगितले.