Join us

Maharashtra Politics: संजय राऊतांच्या ‘चोरमंडळ’ विधानावर उद्धव ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “माझी भूमिका...”

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2023 4:12 PM

Maharashtra News: संजय राऊतांचे विधान महाराष्ट्रद्रोही असल्याचे सांगत सत्तापक्ष आक्रमक झाला असून, कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात जोरदार घमासान झालेले पाहायला मिळाले. संजय राऊत यांनी विधिमंडळासंदर्भात केलेल्या विधानावरुन शिवसेना शिंदे गट आणि भाजप आक्रमक झाले आहेत. संजय राऊतांवर हक्कभंग आणला गेला असून, १५ सदस्यांची समिती निर्णय घेण्यासाठी गठीत करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. 

संसदेत पक्षनेतेपदावरुन काढून टाकण्यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, टाकू द्या. बनावट शिवसेना आहे, डुप्लिकेट. चोरांचे मंडळ आहे, विधिमंडळ नाही चोरमंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरुन काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. अशी अनेक पदे आम्हाला पक्षाने, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी दिली. जी आम्ही ओवाळून टाकतो पक्षासाठी. आम्ही लफंगे नाही. पदे गेली तरी परत येतील, आमचा पक्ष महत्त्वाचा आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली होती. प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. 

त्यानंतर मी माझी भूमिका मांडेन

संजय राऊतांनी केलेल्या विधानाच्या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पुढील एक-दोन दिवसात संजय राऊत मुंबईत परत येणार आहेत. ते मुंबईत आल्यानंतर मी त्यांच्याशी चर्चा करेन की, तुम्ही नक्की काय बोलले होते. त्यानंतर मी माझी भूमिका मांडेन, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधीपक्षाला देशद्रोही म्हटले नव्हते तर मग ते कोणाला देशद्रोही म्हणाले होते? ते कुणाबरोबर चहापान करणार होते? ‘चाय पे चर्चा’ कुणाबरोबर होणार होती? मग त्यांनी चहासाठी देशद्रोह्यांना आमंत्रित केले होतं का? या सर्व प्रश्नांचाही खुलासा व्हायला हवा. त्यांच्या नजरेत नेमके देशद्रोही कोण आहे? विरोधीपक्ष देशद्रोही नसेल तर मग ते कुणाबरोबर चहा पिणार होते? त्यांनी चहापानासाठी कुणाला आमंत्रित केले होते? असे प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले. 

दरम्यान, वापरा आणि फेका हीच भाजपाची निती राहिली आहे. कसब्यात टिळकांच्या घराण्याला आणि गोव्यात पर्रिकरांच्या मुलाला भाजपाने टाकले, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली. तसेच कसब्याच्या निकालाने लोक वेगळा विचार करू शकतात हे दाखवून दिले आहे. चिंचवडमध्येही भाजपविरोधातील मते पाहिली, तर तिथेही भाजपविरोधात निकाल लागला असता. भाजपविरोधातील मतांना एकत्र कसे करता येईल हाच मोठा प्रश्न आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :उद्धव ठाकरेसंजय राऊत