Join us

“देवेंद्र फडणवीस वाजपेयींच्या विचारांवर चालणार की जिन्नांच्या?”; उद्धव ठाकरेंचा प्रतिप्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 15:26 IST

Uddhav Thackeray PC News: बाळासाहेबांचे विचार आम्हाला सांगू नका. आम्हाला शिकवू नका, असा पलटवार उद्धव ठाकरेंनी केला.

Uddhav Thackeray PC News: बुधवारचा दिवस वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून चांगलाच गाजला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी केवळ यावर राजकीय मते व्यक्त केली नाही, तर सुधारणा विधेयकावर लोकसभेत विस्तृत चर्चा झाली. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी आपापले म्हणणे मांडले. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत दीर्घ चर्चेनंतर मध्यरात्री मतदानाने पारित करण्यात आले. या विधेयकाच्या बाजूने २८८ तर विरोधात २३२ एवढी मते पडली. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाला डिवचले होते. यावर उद्धव ठाकरेंनी भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिप्रश्न केला आहे. 

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत सादर होण्याच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत ठाकरे गटाला खोचक टोला लगावला होता. बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाला केला होता. तसेच पत्रकारांशी बोलताना, मी आधीही सांगितलेले आहे की, ज्यांची ज्यांची सद्सद्विवेकबुद्धी जिवंत असेल, ते या विधेयकाला पाठिंबा देतील आणि विशेषतः ठाकरे गटाच्या संदर्भात बोलायचे झाले तर, जर हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर अजूनही चालण्याची त्यांची इच्छा असेल, तर मला अपेक्षा आहे की, ते या विधेयकाला समर्थन देतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावरून आता पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पलटवार केला आहे. 

देवेंद्र फडणवीस वाजपेयींच्या विचारांवर चालणार की जिन्नांच्या?

देवेंद्र फडणवीस जे काही आम्हाला विचारत आहेत माझा त्यांना सवाल आहे की, ते अटलबिहारी वाजपेयींच्या विचारांवर चालणार आहेत की मोहम्मद अली जिन्ना आणि नवाज शरीफ यांच्या विचारांवर चालणार आहेत? जी भाषणे लोकसभेत झाली ती जिन्नांनाही लाजवणारी होती. शिवाय बाळासाहेबांचे विचार वगैरे सांगू नका. बाळासाहेब ठाकरेंचे विचार आम्हाला शिकवू नका, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले. 

दरम्यान, जिन्नांनाही लाज वाटली असेल अशी भाषणे लोकसभेत करण्यात आली. जिन्नांनी जे केले नाही ते भाजपाचे नेते आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी करून दाखवले. ते आम्हाला हिंदूत्व सोडले असे म्हणत आहेत तर मग काल भाजपाने काय सोडले होते? जे तुम्ही करत होतात ते लांगुलचालनच होते. कारण तुम्हाला समोर निवडणूक दिसते आहे. फोडा आणि राज्य करा ही भाजपाची नीती आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. 

 

टॅग्स :उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसवक्फ बोर्डबाळासाहेब ठाकरे