Uddhav Thackeray Taunt CM Devendra Fadnavis: मुंबईत राजभवन येथे दिमाखदार पद्धतीने पार पडलेल्या लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार’ सोहळ्यात ‘मोस्ट पॉवरफुल पॉलिटिशियन’ या पुरस्काराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी पेनोंड रिकार्ड इंडियाचे नॅशनल हेड, कॉर्पोरेट अफेअर्स प्रसन्न मोहिले, लोकमत मीडिया समूहाच्या एडिटोरियल बोडांचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी तथा बँकर अमृता फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दांत उत्तर दिले. आता यावरून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना टोला लगावला आहे.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे दोन वाक्यात तुम्ही वर्णन कसे कराल? असा प्रश्न जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एकाच वाक्यात करू का? वाईट वाटून घेऊ नका, ‘काही भरोसा नाही’. यानंतर विधान भवनात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असलेल्या उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली. यावर उद्धव ठाकरे यांनी मिश्किलपणे उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.
सोनू, तुझा माझ्यावर भरवसा नाही का? म्हणून दुसरा घरोबा केला का?
उद्धव ठाकरे म्हणाले की, एक ते गाणे होते ना? कुठले गाणे होते? सोनू, तुला माझ्यावर भरवसा नाही का? त्यामुळे आता सोनू तुला माझ्यावर भरवसा नाही का? असे त्यांनाच विचारा. ते गाणे आले तेव्हा देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होते. त्यांचा सत्कारही वर्षा बंगल्यावर केला होता. सोनू, तुझा माझ्यावर भरवसा नाही काय? म्हणून तुम्ही दुसरा घरोबा केला का? अशी विचारणा करत, उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
दरम्यान, थडगी उकरायची, आणखी काही काढायचे हे सगळे दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. जनतेने तुम्हाला बहुमत दिले आहे त्यावर लोकांचा संशय आहे. पण जर तुम्हाला बहुमत मिळाले आहे, सत्तेवर बसण्याची संधी मिळाली आहे, तर त्या संधीचे सोने करा. त्याचा चिखल करु नका. नेत्यांनी प्रक्षोभक भाषणे करू नयेत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले असतील, तर मी त्यांच्या या वक्तव्याचे स्वागत करतो. त्यांच्याकडे आगलावे लोक आहेत, ते म्हणजे विरोधी पक्ष संपवायला घेतलेले विष आहे. तेच विष आता भाजपाला मारत आहे. औरंगजेब कबरी प्रकरणावर संघाने घेतलेल्या भूमिकेचे स्वागत आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.