मुंबई - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा शेवट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने झाला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिवसेनेनं इतिहासातील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडाचा सामना केला. संयमी नेतृत्व म्हणून गेली अडीच वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं गेलं. बुधवारी उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला. त्याच्या भाषणानंतर सोशल मीडियावरुन भावूक पोस्ट फिरू लागल्या. अर्थातच, शिंदे गटातील शिवसेना नेत्यांनाही याचं दु:ख झालं आहे, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी म्हटले. तसेच, देवेंद्र फडणवीस यांना एक विनंतीही केली आहे.
भाजप नेत्यांनी केलेल्या विधानांवरुन केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कुणीतरी एका नेत्याने प्रतिक्रिया देणे अपेक्षित होते, पण दहा -10 नेते प्रतिक्रिया देत होते, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. या प्रतिक्रियांमुळे आम्ही दुखावले जाणारच, कारण आम्ही आमच्या नेत्याविरुद्ध बंड केला नव्हता, आमचा बंड राष्ट्रवादी-काँग्रेसविरुद्धचा होता, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री पायउतार झाले याचं आम्हालाही दु:ख झालं ना. डोळ्यात अश्रू आले ना, ते अश्रू दिखाव्याचे नाहीत. सत्तास्थापन करत असताना कोणीतरी व्यक्तीगत का बोलावं. प्रत्येकाने भावनांची कदर ठेवली पाहिजे, आम्हीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर करतोच ना, असेही केसरकर यांनी म्हटले.
भाजपच्या विजयी जल्लोषानंतर नाराजी
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या अनेकांनी माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिल्या, भाजप नेत्यांकडून अशी अपेक्षा नाही. कारण, ते ज्या पद्धतीने बोलत होते, त्यातून काहींची मने दु:खी होतात. आमच्या गटाकडून ज्याप्रमाणे प्रवक्त म्हणून मी एकटा बोलतो, तसेच भाजपकडूनही ठराविक लोकांनीच बोललं पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी बोलले असते तर ते स्विकारार्ह होतं, असे म्हणत केसरकर यांनी भाजपच्या विजयी जल्लोषानंतर काहीशी नाराजीही व्यक्त केली आहे. मी फडणवीस यांना जाहीर विनंती करतो, हे ताबडतोब थांबवा. कारण, आम्हीही आमच्या नेत्यासोबत संघर्ष केला. आता, तुम्ही सत्तेवर येत असाल तर त्या लोकांना ताबडतोब थांबवलं पाहिजे, अशी विनंती केसरकर यांनी फडणवीसांकडे केली आहे.
शिवसेना हा विचार
सरकारे येत असतात, जात असतात पण विचार महत्त्वाचा असतो. आम्ही शिवसेनेचेच आहोत, शिवसेना हा एक विचार आहे. बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्त्वाचा हा एक विचार आहे. त्यामुळे, आमचा वेगळा गट वगैरे नाही, असे म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया दिली. आमचा मंत्रीपदासाठी बंड असेल तर मग आमच्याकडे 6 मंत्री सोबत का आले हेही विचार व्हावा. आमचा बंड हा विचारधारेचा होता, असेही केसरकर यांनी म्हटले.