उद्धव ठाकरेंनी घाईगडबडीमध्ये राजीनामा दिला, ही फार मोठी चूक- पृथ्वीराज चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 04:52 PM2022-07-20T16:52:55+5:302022-07-20T16:53:09+5:30
सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई- शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबतसोबत इतर याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात एकत्रित सुनावणी पार पडली. यात कोर्टानं दोन्ही बाजूंना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी २९ जुलैपर्यंतचा वेळ दिला आहे. तसंच याप्रकरणावर पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी होणार असल्याचं कोर्टानं नमूद केलं आहे.
सुप्रीम कोर्टात आज दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद झाला. यात कोर्टानं सुनावणी १ ऑगस्टपर्यं पुढे ढकलली असली तरी राज्यातील सत्तेची परिस्थिती जैसे-थे ठेवण्यात यावं अशी मागणी शिवसेनेची बाजू मांडणारे वकील कपिल सिब्बल यांनी केली. त्यावर कोर्टानं नेमका काय निर्णय दिला हे फडणवीसांनी यावेळी स्पष्टपणे समजावून सांगितलं.
सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घाईगडबडीमध्ये राजीनामा दिला, ही फार मोठी चूक केली आहे. विधिमंडळामध्ये जाऊन त्यांनी भाषण केलं पाहिजे होतं. आपलं मत काय, काय परिस्थिती झाली, काय आरोप झाले, हे सर्व अधिकृतपणे सदनामध्ये सांगायला पाहिजे होतं, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
मोठ्या घटनापीठाकडे प्रकरण जावं- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कोर्टात झालेल्या सुनावणीवर आम्ही नक्कीच समाधानी आहोत. कारण आमजी बाजू भक्कम आहे. प्रकरण कोर्टात असल्यानं यावर मी अधिक बोलणार नाही. पण न्यायाधीशांनी हे प्रकरण संविधान पीठाकडे जावं का याबाबतचं महत्वाचं विधान केलं आहे. त्यामुळे यासंदर्भात १ ऑगस्ट रोजी कोर्ट काय निकाल देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.