CoronaVirus : राज यांच्या आवाहनाला उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 07:38 PM2020-04-16T19:38:13+5:302020-04-16T19:39:04+5:30

शासनाकडून सकारात्मक आकडेवारी जारी 

Uddhav Thackeray responds to Raj's appeal | CoronaVirus : राज यांच्या आवाहनाला उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद

CoronaVirus : राज यांच्या आवाहनाला उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद

Next

 

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन करावे आणि प्रशासनाने तत्परतेने त्याबाबत कार्यवाही करावी, अशी घटना आज समोर आली आहे. राज यांनी कालच मुख्यमंत्री उद्धव यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ठणठणीत बरे झालेल्या रूग्णांची आकडेवारी कोणतेच सरकार जारी करत नाही. दिलासादायक आकडेवारीही समोर यायला हवी, अशी भूमिका राज यांनी मांडली. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनीही याची दखल घेतली. आणि आज प्रशासनाकडून ठणठणीत बरे झालेल्या रूग्णांची विस्तृत आकडेवारी जारी करण्यात आली. 

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने लोकांना सोशल मीडियातून संबोधित करत दिलासा देत आहेत. अलीकडेच फेसबुकच्या माध्यमातून राज्याला संबोधित करताना, कोरोना विरूद्धच्या या लढ्यात राजही माझ्यासोबत असल्याचे विधान मुख्यमंत्री उद्धव यांनी केले होते. दोन्ही नेत्यांमध्ये वेळोवेळी चर्चाही होत असल्याचे सांगितले जात होते. त्यातच राज यांनी केलेल्या आवाहनाला मुख्यमंत्री ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि प्रशासनाकडून त्याची तातडीने अंमलबजावणी होईल याचीही दक्षता घेतल्याचे दिसून आले आहे. आजवर कोरोनाबाबत प्रशासनाकडून विविध आकडेवारी जारी केली जात असे. मात्र, यात बरे झालेल्या रुग्णांची एकत्रित माहिती अथवा याबाबतच्या सकारात्मक घटनांचा उल्लेख नसे. परंतु,  आज याबाबची आकडेवारीसह दिलासादायक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले. 'आनंदाची बातमी' या मथळ्याखाली हे पत्रक पाठविण्यात आले. कोरोनाच्या या लढाईत पक्षीय राजकारण आणि भेद बाजूल ठेवले जात आहेत. योग्य सूचना केल्या जात असून त्याची तातडीने दखलही घेतली जात असल्याची आनंदाची बाब मात्र यानिमित्ताने समोर आली आहे.

 

राज यांनी आज फेसबुकवर एक पोस्ट टाकली. यात आपण कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचे नमूद केले आहे. कोरोनातून ठणठणीत बरे झालेल्यांचा आकडा मोठा आहे. मात्र या आकडेवारीला सरकारी पातळीवर पुरेशी प्रसिद्धी दिली जात नाही. अशा बातम्यांची योग्य प्रसिद्धी झाली तर नागरिकांचा आपल्या डॉक्टरांवरचा, आरोग्य कर्मचाऱ्यांवरचा विश्वास अधिक वाढेल, अशी भूमिका राज यांनी मांडली. शिवाय, ही बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही निदर्शनास आणून दिली असल्याचे राज यांनी सोशल मीडियातील पोस्टद्वारे सांगितले. 

 

कोरोनाशी निव्वळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्व राज्यातील प्रशासने दोन हात करत आहेत. बहुसंख्य नागरिक देखील प्रशासनाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करत आहेत. त्यामुळे या आजाराचा जलद प्रसार आपण काही प्रमाणात रोखू शकल्याचे सांगून राज ठाकरे म्हणाले की या आजारावर मात करून हजारो बाहेर पडलेत हे दिलासादायक आहे. याबाबतच्या बातम्या दिल्यास आजार नियंत्रणात आहे असे वाटून लोक लगेच बाहेर पडतील असा जर प्रशासनाचा समज असेल तर तो चुकीचा आहे. ३ मे पर्यंतच्या लॉकडाऊनचे लोक पालन करतील याविषयी शंका नाही, असे राज यांनी नमूद केले आहे. 

 

एखाद्याला कोरोनाची लागण झाली आहे किंवा तशी शक्यता आहे, या समजातुनच त्या व्यक्तीला वाळीत टाकण्याचे प्रकार समोर येत आहेत. हा प्रकार चुकीचा तर आहेच पण तो आपल्या सर्वांना नुकसानकारक ठरेल. शंकेनेसुद्धा वाळीत टाकण्याचे प्रकार घडू लागले तर लक्षणे लपविण्याकडेच लोकांचा कल राहिल. त्यामुळे लॉकडाऊनसकट केलेल्या अनेक उपाययोजना निष्प्रभ ठरतील, असा इशाराही राज यांनी दिला. कोरोना हा संसर्गजन्य आहेच. पण टी.बी.सारखे अनेक आजारही संसर्गजन्य असतात. म्हणून त्या रुग्णांना आपण वाळीत टाकत नाही. मग आत्ताच हे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. रुग्ण ठणठणीत बरे होऊन बाहेर पडत आहेत ह्याचे आकडेवारी देणारे एक ‘न्यूज बुलेटिन’ आठवड्यातून एकदा सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारने जारी करावे. माध्यमांनी देखील ह्या मुद्द्याचे गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन राज यांनी केले.

Web Title: Uddhav Thackeray responds to Raj's appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.