Uddhav Thackeray Congress: सध्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा आता महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षाने भारत जोडोला पाठिंबा दर्शवला असून राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते यात सहभागी झाले होते. याशिवाय, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनीही या यात्रेत राहुल यांच्यासोबत हजेरी लावली होती. उद्धव ठाकरे या यात्रेत सहभागी होणार की नाही यावरून अजूनही चर्चा सुरू आहे. तशातच, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत एकत्र येण्यामागचे कारण स्पष्ट केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब शिवतीर्थावर आदरांजली अर्पण केली. त्यावेळी ते बोलत होते.
बुलढाण्यात पक्षाची सभा घेण्यासाठी परवानगी देण्यावरून काही वाद असल्याचे समजले. त्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत एकत्र येण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. "यासाठीच आम्ही आणि काँग्रेस एकत्र आलोय. सध्या सभेसाठी परवानगी लागतेय. त्यांचे लोक वाटेल ते करतात (पण दुसऱ्या पक्षाला काही करता येत नाहीये.) देशाचं स्वातंत्र्य ज्यांनी मिळवून दिलं ते स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सध्या केवळ काँग्रेसच नव्हे तर देशभरातील विविध राज्यातील स्थानिक पक्षही प्रयत्नशील आहेत, आम्हीही त्यामुळेच त्यांच्यासोबत एकत्र आलो आहोत," असे राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितले.
"किमान समान कार्यक्रमावर मी गेली अडीच वर्षे सरकार चालवले. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासोबत आम्ही एकत्र होतो. जे तोतया हिंदुत्ववाद्यांना बरेच काळ जमले नाही, ते नामंतरण (संभाजीनगर आणि धाराशिव) आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या साथीने करून दाखवलं याचा मला अभिमान आहे," असे रोखठोक उत्तर उद्धव ठाकरेंनी दिले.
"राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या विधानाशी मी सहमत नाही. मी आजही स्पष्टपणे सांगू इच्छितो की सावरकरांबद्दल आदर, प्रेम, आपुलकी आमच्या मनात आहेच. ती कधीच पुसली जाणार नाही. पण जे लोक स्वातंत्र्यलढ्यापासून लांब होते त्यांना स्वातंत्र्यावीरांबद्दल बोलण्याचा अजिबात अधिकार नाही. स्वातंत्र्यलढ्यात तुमचे किती कार्यकर्ते होते हे आधी पाहावं मग सावरकरांवर बोलावं", असे प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिली.