"उद्धव ठाकरे हेच राज्य चालवतात; वेळोवेळी सोनिया गांधी अन् शरद पवारांचा सल्ला घेतात"
By मुकेश चव्हाण | Published: October 30, 2020 07:29 PM2020-10-30T19:29:00+5:302020-10-30T19:29:22+5:30
सोनिया गांधी आणि शरद पवार यांचा वेळोवेळी सल्लाही घेतात, असं मंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी सांगितले आहे.
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही. व्हिडीओ कॉन्फरर्सद्वारे चर्चा करीत नाहीत. ते काय प्रश्न सोडविणार? त्यांना भेटून काय उपयोग? त्यांनी सरकार चालविण्याचे कंत्राट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे दिले आहे, असा टोला भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानावरुन आता शिवसेनेनंही प्रत्युत्तर दिलं आहे.
शरद पवार हेच राज्य चालववितात, मग उद्धव ठाकरे यांना भेटून काय उपयोग, ते घराबाहेर पडत नाहीत. आठ महिने झाले, त्यांनी माझ्या पत्राचे साधे उत्तरही दिले नाही. राज्यात देवेंद्र फडणवीस व शरद पवार हेच जनतेला सहज भेटतात, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यावर उद्धव ठाकरे हेच राज्य चालवतात. तसेच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि शरद पवार यांचा वेळोवेळी सल्लाही घेतात, असं मंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी सांगितले आहे.
ही तर महाराष्ट्राची संस्कृती-
माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांचे कौतुक केले होते. त्याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री घर सोडण्यास तयार नसताना शरद पवार या वयातही राज्यभर फिरत आहेत. त्याचे कौतुक केले तर काय झाले? पक्ष कोणताही असो, काम करणाऱ्या व्यक्तीचे कौतुक झालेच पाहिजे. हीच महाराष्ट्राची संस्कृती असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
जाणत्या राजाला हे शोभत नाही-
घटनात्मक पदावर असलो तरीही आपण जनतेला उत्तरदायी आहोत, या उदात्त भावनेने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या वर्षभराच्या कामाचा अहवाल प्रसिद्ध करून लोकप्रतिनिधींकडे पाठविला असता शरद पवार यांनी त्यावर कुत्सितपणे उत्तर पाठविले आहे. असा दृष्टिकोन जाणत्या राजाला शोभत नाही, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
राज्यपालांनी पाठविलेल्या कार्यअहवालावर शरद पवार यांनी पाठविलेला अभिप्राय सध्या चर्चेत आहे. त्यावरून चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर निशाणा साधला. पुस्तकात एखाद-दुसरा प्रसंग वगळता शपथविधी, स्वागत समारंभ, दीक्षांत समारंभ, सोहळे, उच्चपदस्थ गाठीभेटी, सांस्कृतिक कार्यक्रम, छायाचित्रेच आहेत, असे शरद पवार यांनी पत्रात म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे.