Uddhav Thackeray Matoshree PC News: मालवण सिंधुदुर्ग येथील राजकोट परिसरात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. तर ठाकरे गटासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी थेट मालवण गाठत परिसराची पाहणी केली. त्याचवेळी भाजपा नेते आणि खासदार नारायण राणे तिथे पोहोचले. यावेळी ठाकरे गट आणि नारायण राणे समर्थकांमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यातच मुंबईतील मातोश्री येथे पत्रकार परिषद घेऊन, रविवार, ०१ सप्टेंबर रोजी हुतात्मा चौकात जाऊन आंदोलन करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
महाविकास आघाडीतील शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी मातोश्रीवर एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या तीनही नेत्यांनी या प्रकरणी सरकारला धारेवर धरत जोरदार टीकास्त्र सोडले. महाराष्ट्रात एकप्रकारची अस्वस्थता आहे. महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. भ्रष्टाचार वाढत आहे. त्यातच सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. महायुतीला जेवढी इंजिन लावले, तेवढा भ्रष्टाचार वाढत आहे. राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडीकडून पाहणी दौरा आणि त्यानंतर निषेध आंदोलन घेण्यात आले आहे. मात्र तिथे शिवद्रोही लोक आडवे आले. महाराष्ट्र या शिवद्रोह्यांना धडा शिकवेल, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला.
१ सप्टेंबरला हुतात्मा चौकात आंदोलन करणार
वाऱ्याने पुतळा पडला कारण हे निर्लज्जपणाच कळस गाठणारे सरकार आहे. राज्यपाल कोश्यारी यांनीही शिवाजी महाराजांचा अपमान केला होता. पण कोश्यारींची टोपी वाऱ्याने उडाली असे कळले नाही. गद्दार केसरकर म्हणाले की, चांगले घडेल. हे महाफुटीचे सरकार आहे. यांच्या कारभाराने किळस आणली आहे. रविवार, १ सप्टेंबरला दुपारी ११ वाजता हुतात्मा स्मारकाला वंदन करणार आहोत. गेटवेला शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. तो पुतळा मजबुतीने उभा आहे. आम्ही या पुतळ्यासमोर जमणार आहोत आणि जोडे मारो आंदोलन करणार आहोत. मी असेन, शरद पवार असतील, नाना पटोले असतील, आम्ही सर्व जण तिथे जाणार आहोत. सर्व शिवप्रेमींनी यावे, अशी विनंती आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
दरम्यान, सरकारची महाराष्ट्र द्रोही आणि शिवद्रोही ही प्रतिमा गडद होत आहे. यांच्या नसानसात शिवद्रोह ठासून भरलेला आहे. तो शिवद्रोह महाराष्ट्र सहन करणार नाही. आम्ही तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्र बंद केला होता. पण न्यायालयाच्या माध्यमातून त्यावर बंदी घातली होती. महाराष्ट्राचे न्यायालय असो किंवा कोलकात्याचे न्यायालय असेल. मी लक्ष ठेवत आहे. ज्यांनी बंद बेकायदेशीर ठरवला. ते भाजपवर काय कारवाई करतोय ते पाहू, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.