Uddhav Thackeray: शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतिर्थवरच, उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 09:40 PM2022-09-06T21:40:40+5:302022-09-06T21:41:17+5:30
अमित शहांनी मुंबई दौऱ्यादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी आपल्याला दगा दिला
मुंबई - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर महापालिका निवडणुकांची रणनिती ठरविण्यासाठी शिवसेनेनंही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेतली. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दसरा मेळाव्यावरुन शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा वाद शिवसेनेत रंगला आहे. दोन्ही गटांनी दसरा मेळाव्यावर आपलाच हक्क दाखवला असून सध्या हा विषय सध्या कागदांत अडकला आहे. या वादावर उद्धव ठाकरे यांनी आपली स्पष्ट भूमिका शिवसेना पदाधिकाऱ्यांसमोर मांडली. तसेच, शिवतिर्थावर दसरा मेळावा आपलाच होणार असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं.
अमित शहांनी मुंबई दौऱ्यादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी आपल्याला दगा दिला. शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा, असं अमित शहा म्हणाले. आजच्या शिवसेनेच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी जमीन दाखविण्याची भाषा करणाऱ्यांना आस्मान दाखविण्याचा मंत्र पदाधिकाऱ्यांना दिला. तसेच, दसरा मेळाव्यासंदर्भातही भाष्य केलं. शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील शिवतिर्थ मैदानावरच होणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी ठणकावून सांगितलं. आता, मोठी जबाबदारी निष्ठावंतांवर आहे, आपल्याला मिळून ही लढाई लढायची आहे, असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी शिवसेना नेत्यांना सांगितलं. तर, अमित शहांचा मुंबई दौरा म्हणजे वरुन किर्तन आतून तमाशा असल्याची टिकाही त्यांनी केली.
महिला संघटकांचीही बैठक
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपा जोरदार तयारी केली असताना आता शिवसेना देखील मैदानात उतरली आहे. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानंतर शिवसेनेने ७ ऑगस्ट म्हणजेच उद्या विभागप्रमुख आणि महिला संघटकांची बैठक बोलावली आहे. मातोश्री या निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सदर बैठक पार पडणार आहे.