Uddhav Thackeray News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर केली. यानंतर वर्षा गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळेस ईशान्य मुंबईचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्यासह कल्याण डोंबिवलीच्या उमेदवार वैशाली दरेकर उपस्थित होत्या. ठाकरे गटाच्या या दोन्ही उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. यावेळी माझे मत वर्षा गायकवाड यांना आहे. त्यांना खासदार करून दिल्लीत पाठवणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हा मतदारसंघ माझ्यासाठी नवा नाही. मुंबईतील सहाच्या सहा जागा महाविकास आघाडीच्या निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यंदा सन २००४ ची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास वर्षा गायकवाड यांनी व्यक्त करत असतानाच उद्धव ठाकरे यांनी थांबवले आणि वर्षाताई एक मिनिट माझे मत तुला मिळणार आहे. कारण मी तिचा मतदार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
पंजाला पहिल्यांदा मतदान, पण हातामध्ये मशाल
देशात हुकूमशाही येऊ नये, राज्यघटना बदलू नये, यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी लढतेय आणि जिंकणार आहे. वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. त्या कुठूनही लढू शकतात आणि जिंकू शकतात. महायुतीबरोबर आम्ही आघाडी केलेली नाही, त्यामुळे त्यांच्या उमेदवाराचे काही सांगू शकत नाही, असा टोला लगावत, पंजाला मतदान करत असलो तरी त्या हातामध्ये मशाल आहे. त्याचा एकत्रित परिणाम होईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, नाना पटोले म्हणतात तसे, काही लोक चावीचे खेळणे आहेत, जशी चावी दिली जाईल तसं खेळतात, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केली. तसेच सांगली आमची चांगली आहे, असे सांगत चंद्रहार पाटील यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.