ठाकरे मुंबईत लढवणार लोकसभेच्या चार जागा, उमेदवार झाले निश्चित
By मनोहर कुंभेजकर | Published: February 21, 2024 05:00 PM2024-02-21T17:00:56+5:302024-02-21T17:04:23+5:30
२०२४ च्या आगामी लोकसभा निवडणुकीत मुंबईतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष चार जागा लढवण्यास सज्ज झाला आहे.
मनोहर कुंभेजकर, मुंबई : २०२४ च्या आगामी लोकसभा निवडणुकीत मुंबईतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष चार जागा लढवण्यास सज्ज झाला आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये शिवसेना-भाजप युतीत शिवसेनेने दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या तीन जागांवर निवडणूक लढवली होती.आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबई या मुंबईतील सहा लोकसभा जागांपैकी चार जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
मातोश्रीत गेल्या ऑक्टोबर २०२३ मध्ये झालेल्या लोकसभा मतदारसंघांचा आढावा बैठकीत उद्धव ठाकरे यांनी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी लोकमतला दिली.
आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कंबर कसली आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने राज्यात एकूण १८ लोकसभा मतदार संघापैकी मुंबईत चार लोकसभा मतदार संघात लोकसभा निवडणूक समन्वयक नियुक्त केले आहेत.
२७-मुंबई-उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात विलास पोतनीस, २८-मुंबई उत्तर पूर्व(ईशान्य मुंबईत) दत्ता दळवी, ३०-मुंबई-दक्षिण मध्य मध्ये रवींद्र मिर्लेकर तर ३१ -मुंबई-दक्षिण मध्ये सुधीर साळवी व सत्यवान उभे यांची लोकसभा समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे.
उत्तर पूर्व मुंबई (ईशान्य मुंबई) या लोकसभा मतदार संघासाठी माजी महापौर दत्ता दळवी यांची ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक समन्वयकपदी नियुक्ती केल्याने महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघ सोडण्यात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.तर येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार संजय दिना पाटील हे शिवसेनेचे उमेदवार असतील अशी कुजबुज महाविकास आघाडीत आहे.
दक्षिण मुंबईत विद्यमान खासदार अरविंद सावंत,दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेना नेते-माजी राज्यसभा खासदार अनिल देसाई आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून शिवसेना उपनेते-युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर यांच्या नावावर उद्धव ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केले आहे.