Join us

Uddhav Thackeray: शिवधनुष्य जे रावणाला नाही पेललं, ते मिंध्यांना काय पेलणार? ठाकरे कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 3:31 PM

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला.

मुंबई - शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवन येथे राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. 'आम्ही काल निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णया विरुद्ध सर्वाच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, केंद्रीय निवडणूक आयोग बरखास्त करण्यात यावे अशी मागणीही करण्यात आल्याचे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले. त्यानंतर, उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला. यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. पण या धक्क्यातून खचून न जाता पक्षाला सावरण्यासाठी आता उद्धव ठाकरे कामाला लागले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील शिवसेना भवनात पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन केलं. यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत शिंदे गट आणि अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

उद्धव ठाकरेंनी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. काल ते म्हणाले की अमित शहा हे मला वडिलांसारखे आहेत, माझे तर वडिल चोरलेच आहेत. आणखी किती जण ह्यांना वडिलांसारखे आहेत, कोण जाणे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.शिवधनुष्य हे रावणाला पेलले नाही, या मिध्यांना काय पेलणार असे म्हणत शिवधनुष्य चिन्ह आणि शिवसेना पक्ष मिळवण्याची आपली लढाई सुरूच राहिल, असेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. 

निवडणूक आयोगाचा निर्णय अयोग्य

'निवडणूक आयोगाने आम्हाला जी कागदपत्र सांगितली ती आम्ही त्यांना दिली. त्यांनी सदस्य संख्या सांगितली ती सर्व दिली. पहिल्यांदा एक निकष लावला, पुन्हा सदस्य संख्येचा निकष लावला. तुम्हाला हाच निकष लावायचा होता तर आम्हाला प्रतिज्ञा पत्र का द्यायला लावली, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच, निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य नाही, असेही ते म्हणाले. 

 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाएकनाथ शिंदेभारतीय निवडणूक आयोग