मुंबई- मुंबई महापालिका निवडणूक आणि शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुंबईतील शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा घेणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भाषणांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
गटप्रमुखांच्या मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना मुंबई महापालिका निवडणुकीचे शिवसेना रणशिंग फुंकणार आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या भाषणाआधी ठाकरे गटातील खासदार आणि नेते गजानन किर्तीकर यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे. भाजपा आणि शिवसेनेची युती नैसर्गिक होती. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती नको, असं आमचं ठाम मत आहे, असं गजानन किर्तीकर यांनी म्हटलं आहे. गजानन किर्तीकर देखील गोरेगावच्या नेस्को मैदानात मेळाव्यासाठी दाखल झाले आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार की नाही, यावर अद्याप स्पष्टता नसली तरी, दसरा मेळाव्याआधीच उद्धव ठाकरेंची तोफ मुंबईत धडाडणार आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंनी ही सभा आयोजित केली आहे. एकनाथ शिंदेंनी फोडलेले आमदार, भाजपाने खेळलेला डाव आणि महापालिका निवडणुकीबरोबरच ठाकरे नुकत्याच झालेल्या फॉक्सकॉन पळवापळवीवर देखील बोलण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे थोड्याच वेळात मेळाव्यास्थळी दाखल होणार आहे. मुंबईतील शाखांमधून शिवसैनिकांच्या गाड्या गोरेगाव नेस्कोसाठी निघाल्या आहेत. नेस्को सेंटरच्या गेटवर माजी मंत्री अनिल परब, आमदार सुनील प्रभू, अनिल देसाई दाखल झाले आहेत. शिवसेनेच्या गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये गटप्रमुख मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होत आहेत.
पक्षाला नवसंजीवनी देण्याच्या प्रयत्न-
एकेकाळी खांद्याला खांदा लावून ठाकरे, शिंदे आणि फडणवीस काम करत होते. पण आता ठाकरे विरुद्ध सारे असे चित्र तयार झाले आहे. गटप्रमुखांचा मेळावा म्हणजे पक्षाला नवसंजीवनी देण्याच्या उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असेल, असे म्हटले जात आहे. बंडानंतर अनेक कार्यकर्ते, नेते हे शिंदे गटात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अधिकाधिक कार्यकर्त्यांना आपल्यासोबत ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे मेळावा घेणार असल्याचे बोलले जात आहे.