Join us

संजय राऊत यांना खुलासा करण्यासाठी मुदतवाढ, विधानसभा अध्यक्षांची सभागृहात माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2023 6:37 AM

विधिमंडळ हे चोरमंडळ असल्याचे विधान केल्याप्रकरणी विधानसभेने ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्याकडे लेखी खुलासा मागितला होता.

मुंबई : विधिमंडळ हे चोरमंडळ असल्याचे विधान केल्याप्रकरणी विधानसभेने ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्याकडे लेखी खुलासा मागितला होता. यासंदर्भात संजय राऊत यांनी आपल्या म्हणण्याचा विपर्यास केल्याचे सांगत खुलाशासाठी मुदतवाढ मागितली. ही मुदतवाढ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंजूर केली असून, मुदतीत खुलासा न केल्यास पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी बुधवारी सभागृहात जाहीर केले.

आमदार अतुल भातखळकर आणि भरत गोगावले यांनी राऊत यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर यासंदर्भात ४८ तासांत लेखी खुलासा करण्याची नोटीस विधानसभा अध्यक्षांनी १ मार्चला संजय राऊत यांना बजावली होती. या नोटिसीवर त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून मुदतवाढ देण्याची मागणी केली. त्यानुसार राऊत यांना लेखी खुलासा सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

वक्तव्य विशिष्ट गटापुरते४ मार्चपर्यंत महाराष्ट्र दौऱ्यावर होतो व कर्नाटकच्या सीमेवरील भागात असल्याने मुंबईशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे मुदतीत खुलासा करणे शक्य झाले नाही. तरी  सविस्तर खुलासा करण्यासाठी आणखी मुदतवाढ मिळावी. महाराष्ट्र विधान मंडळाचा व सदस्यांचा मी आदर करतो.  मी राज्यसभेचा सदस्य असल्याने मला अशा संसदीय मंडळाचे महत्त्व माहीत आहे. मी संपूर्ण विधिमंडळाबाबत कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नसून माझे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतेच मर्यादित आहे, असे राऊत यांनी आपल्या लेखी उत्तरात स्पष्ट केले.

टॅग्स :संजय राऊतमहाराष्ट्र