Join us

मराठा समाज कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ठाकरे गट मुंबईत आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2023 10:48 AM

जालन्यात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे तणाव

Jalna Police Protest: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी दुपारनंतर या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले. आंदोलक आणि पोलिसांमध्ये यांच्यामध्ये वाद झाल्यानंतर लाठीचार्ज करण्यात आला. सायंकाळी बस जाळण्यात आला. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालन्याकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले, तर इकडे बीडमध्येही याचे पडसाद उमटले. मराठा समाजाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मागण्या मान्य करण्याची मागणी केली. आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यात आला. याच घटनेचा आज ठाकरे गटाने मुंबईतही निषेध केला. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि आमदार अजय चौधरी यांनी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून त्या घटनेचा निषेध नोंदवला.

"जालन्यात शांतपणे सुरू असलेल्या आंदोलनात दरम्यान घरात घुसून लाठीचार्ज, गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. हे सगळं करणारा कर्ता - करविता कोण? महाराष्ट्रद्रोही सरकार आहे हिंदूद्रोही सरकार आहे, जे गणपतीमध्ये लोकसभेचे अधिवेशन घेत आहे. 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमासाठी मराठा आंदोलन मोडून काढण्याचा हा प्रयत्न करण्यात आला. हे सरकार आंधळं, मूकं, बहिरं, लाचार सरकार आहे. मराठा आंदोलकांच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठामपणे उभे आहे", असे शिवसेना उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले.

"मराठा आंदोलकांवर जालना येथे झालेल्या लाठीचाराचा निषेध म्हणून आम्ही येथे मुका आंदोलन करून निषेध व्यक्त करत आहोत. पोलिसांवरचे नियंत्रण संपलेले आहे. बार्शी येथे आंदोलकांवर लाठीचार्ज, वारकऱ्यांवर लाठीचार्ज आणि आता मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज या घटनेची सखोल चौकशी केली पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा देण्याची गरज आहे," अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी केली.

टॅग्स :जालनापोलिसशिवसेनाअरविंद सावंतअजय चौधरी