मुंबई - भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या मागणीवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारला भातखळकर यांनी लक्ष्य केलंय. शरद पवार हेच आमचे विठ्ठल असल्याचं संजय राऊत यांनी यापूर्वी एका कार्यक्रमात म्हटलं होतं. आता, आषाढी एकादशीला शरद पवार यांचीच पूजा करा, असा खोचक टोमणा भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
आषाढी एकादशीला पायी वारीला परवानगी देण्यात यावी अशी मागणी वारकऱ्यांकडून होत असली तरी करोनाचे संकट लक्षात घेत राज्य सरकारने वारीला परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारताना सरकारने मानाच्या १० पालख्यांना १०० वारकऱ्यांसह बसमधून जाण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे, भाजपा नेत्यांकडून राज्य सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. विशेष म्हणजे शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांनीही वारीला परवानगी देण्याची मागणी करत, सरकारवर निशाणा साधला होता. आषाढी वारी होत नसल्यामुळे कोरोना वाढत आहे असे वक्तव्य करत आषाढी वारीला परवानगी द्या, म्हणजे कोरोना जाईल, असे भिडे यांनी म्हटले. आता, अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे.
'सरकारी कार्यक्रम धूमधडाक्यात साजरे करणाऱ्या खंडणी सरकारने आषाढी एकादशीच्या वारीवर मात्र बंदी घातली. आपल्या संतप्त भावनांना वारकऱ्यांनी अचूक शब्दात व्यक्त केले आहे... उद्धव ठाकरे, आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा. म्हणजे थोडक्यात तुमच्या योग्यतेप्रमाणे काम करा, असे ट्विट भातखळकर यांनी केले आहे.
सातत्याने शिवसेना अन् मुख्यमंत्र्यांना टार्गेट
संजय राऊत यांनी लिहिलेल्या लेखावरूनही अतुल भातखळकर यांनी ट्विट करत शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर बोचऱ्या शब्दांत टीका केली होती. बाटला हाऊस एन्काऊंटरवर अश्रू ढाळणाऱ्या सोनिया गांधीचा वाण आणि गुण उद्धव ठाकरेंना लागला आहे. त्यामुळेच दलित आणि मुस्लिमांना सशस्त्र उठावाची ट्रेनिंग देण्याचा ठपका असलेल्या स्टेन स्वामीवर सामनाने छाती बडवली आहे. सामनात आज प्रसिद्ध झालेल्या लेखात स्टेन स्वामींचा उल्लेख ८४ वर्षांचा म्हातारा असा केला आहे. हे लाज कोळून प्यायले आहेत मतांसाठी, असा टोला भातखळकर यांनी लगावला होता.