आधी लिहून द्या; अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेनं भाजपावर वाढवला दबाव!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 02:19 PM2019-10-26T14:19:37+5:302019-10-26T14:33:16+5:30
शिवसेनेच्या नवनिर्वाचित सर्वच आमदारांची मातोश्रीवर बैठक झाली.
मुंबईः शिवसेनेच्या नवनिर्वाचित सर्वच आमदारांची मातोश्रीवर बैठक झाली. तासभर चाललेल्या या बैठकीनंतर शिवसेनेचे आमदार आक्रमक झालेले आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्यासाठी भाजपानं तसं आम्हाला लिहून द्यावं, अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
ज्या 50-50 फॉर्म्युल्याची अमित शाह आणि आमच्यामध्ये चर्चा झाली होती, त्यानुसार सत्तेचं वाटप बरोबरीनं व्हावं. 50 टक्के सत्तेमध्ये त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा आणि 50 टक्के सत्तेमध्ये आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, त्यावेळी अडीच अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासंदर्भातही बोलणी झाली होती. हा निर्णय लेखी पत्राद्वारे भाजपा जोपर्यंत शिवसेनेला कळवत नाही. तोपर्यंत उद्धवजी यासंदर्भात कोणतीही भूमिका घेणार नाहीत. सत्ता स्थापनेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील, तो शिवसैनिकांना बंधनकारक असल्याचंही प्रताप सरनाईकांनी स्पष्ट केलेलं आहे.
Pratap Sarnaik,Shiv Sena:In our meeting it was decided that like Amit Shah ji had promised 50-50 formula before LS polls,similarly both allies should get chance to run Govt for 2.5-2.5 years so Shiv Sena should also have CM.Uddhav ji should get this assurance in writing from BJP. pic.twitter.com/vyaFL1dVV4
— ANI (@ANI) October 26, 2019
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजपामध्ये कटुता आलेली होती. भाजपा सत्तेत कायम शिवसेनेला सापत्न वागणूक देण्याचा प्रयत्न करत होती. त्याचा वचपा शिवसेना काढत असल्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिवसेनाही भाजपावर कुरघोडी करण्याच्या चालत आलेल्या आयत्या संधीचा पुरेपूर वापर करण्याच्या तयारीत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, ‘आमचा फिफ्टी-फिफ्टी’चा फॉर्म्युला ठरला असल्याचे सांगितल्याने अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना अडून बसणार असे स्पष्ट संकेत दिले आहेत. मुख्यमंत्रिपद देणार नसाल तर १९९५च्या युतीच्या फॉर्म्युल्यात भाजपाकडे असलेली खाती शिवसेनेला द्यावीत, अशी भूमिका शिवसेनेकडून घेतली जाऊ शकते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यावेळी उपमुख्यमंत्री, गृह, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, अन्न व नागरी पुरवठा अशी महत्त्वाची खाती भाजपकडे होती. शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची भाजपाची तयारी असल्याचीही चर्चा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याची आपली तयारी आहे, असे निवडणुकीपूर्वीच म्हटलेले होते. उपमुख्यमंत्री पदाशिवाय महसूल, सार्वजनिक बांधकाम दोन-तीन महत्त्वाची खाती आणि दोन-तीन वाढीव मंत्रिपदे देण्याची तयारी भाजपकडून दर्शविली जाऊ शकते. दोन्ही पक्षांमध्ये सत्तावाटपाबाबत लवकरच बैठक होणार आहे. गरज भासल्यास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे देखील त्यासाठी मुंबईत येऊ शकतात. मात्र, सत्तावाटपाचा तोडगा दिवाळीनंतरच निघेल. त्यामुळे फडणवीस सरकारचा शपथविधी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होईल, असे सूत्रांनी सांगितले. 1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान भाजप आमदारांची नेतानिवडीसाठी बैठक होईल आणि त्यात फडणवीस यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होईल, असेही सूत्रांनी सांगितले.