Join us  

'राज्य कसं चालवावं हे उद्धव ठाकरेंनी फडणवीसांकडून शिकावं', नवनीत राणांचा पुन्हा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2022 10:48 AM

भाजपाच्या पाठित खंजीर खुपसणाऱ्यांनी नैतकतेची भाषा करू नये. राज्य कसं चालवावं हे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांकडू शिकावं, असा हल्लाबोल भाजपाच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे.

मुंबई-

भाजपाच्या पाठित खंजीर खुपसणाऱ्यांनी नैतकतेची भाषा करू नये. राज्य कसं चालवावं हे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांकडू शिकावं, असा हल्लाबोल भाजपाच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. त्या मुंबईत खार येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. मुख्यमंत्र्याच्या दडपशाहीची आणि आमच्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार दिल्लीत करण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना होत असल्याची माहिती राणा दाम्पत्यानं यावेळी दिली. यावेळी नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. 

"राज्यासमोर आज अनेक प्रश्न आहेत. ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि बेरोजगारी अशा अनेक समस्यांना राज्य तोंड देत असताना राज्य सरकार मात्र काहीच करत नाही. नैतिकतेची टीका आमच्यावर करणाऱ्यांनी तर बोलूच नये. भाजपाच्या पाठित खंजीर खुपसणाऱ्यांनी नैतिकतेची भाषा करू नये. राज्य कसं चालवावं हे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांकडून शिकावं", असं नवनीत राणा म्हणाल्या. 

"अजित पवारांनी सत्य समोर आणावं"राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य मी ऐकलं. माझं त्यांना एवढचं म्हणणं आहे की तुम्ही उपमुख्यमंत्री असूनही मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त काम करत आहात. त्यामुळे एका महिलेवर अन्याय होत असेल तर त्याची सर्व माहिती समोर आणली गेली पाहिजे. सांताक्रूझ पोलीस ठाण्यातील रात्री साडेबारानंतरचे सर्व फुटेज अजित पवार यांनी तपासून घ्यावेत. त्यानंतरच बोलावं, असं नवनीत राणा म्हणाल्या. 

राणा दाम्पत्याविरोधात राज्य सरकार पुन्हा कोर्टातखासदार नवनीत राणा यांना कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला होता. पुन्हा अशाप्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेला वेठीस धरू नये, पोलिसांना तपासात सहकार्य करावे आणि पुराव्यांशी कोणत्याही प्रकारची छेडछाड करू नये. तसेच माध्यमांना प्रतिक्रिया किंवा मुलाखती देऊ नये अशा अटी घालण्यात आल्या होत्या. मात्र, नवनीत राणा आणि रवी राणा यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, हनुमान चालिसावरून वक्तव्ये केली आहेत. यामुळे त्यांचा जामीन रद्द होण्याची शक्यता आहे. 

सरकारी वकील प्रदीप घरत यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून त्यांनी नवनीत राणा यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा दावा केला आहे. याविरोधात सोमवारी न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :नवनीत कौर राणाउद्धव ठाकरेशिवसेना