मुंबई - पोटनिवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेकडून घोडेबाजार सुरू झाला असल्याचा आरोप भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. याला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी घोडेबाजार करणाऱ्यांनी गाढवाची भाषा वापरू नये असा टोला लगवाला आहे. मनसेच्या सहा नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला यावेळी माध्यामांशी बोलताना त्यांनी सोमय्यावर घणाघाती टीका केली.
यावेळी माध्यामांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोदी लाट ओसरली असल्याचे सांगितले, ते म्हणाले की, भाजपाला आता पोटनिवडणुक जिंकण्यासाठीही सहानभुतीचा आधार घ्यावा लागतो. गेल्या तीन वर्षात कोणत्याही राष्ट्रीय पक्षावर ही वेळ आली नाही, ती ह्यांच्यावर आली आहे. यावेळी त्यांनी नांदेडमधील विजयाबद्दल जनतेच कौतुक तर काँग्रेस आणि अशोक चव्हाण यांचे अभिनंदन केलं. पुढे बोलताना ते म्हणाले भाजपा जर आम्हाला मित्र मानत असेल तर त्यांनी आमच्या आनंदात सामिल व्हावं.
फोडाफोडीच्या होणाऱ्या आरोपावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, इतरांनी केली तर खुद्दारी आणि आम्ही केली तर गद्दारी हे कोणतं राजकारण आहे. जनता सर्व काही पाहून घेईल. आता फोडाफोडी झाली नाही, आधी झाली होती, जुने सहकारी पुन्हा शिवसेनेत आले आहेत. असेही ते म्हणाले.
मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही सगळे एकत्र आलो असल्याची प्रतिक्रिया मनसेतून शिवसेनेत आलेले नगरसेवक दिलीप लांडे यांनी यावेळी दिली.
भाजपा बॅकफुटवरशिवसेनेच्या या खेळीनं भाजपा सध्या बॅकफूटवर गेलं आहे. तर मनसे अजूनही या धक्क्यातून सावरलेलं नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
शिवसेनेनं कोणताही घोडेबाजार केलेला नाही - अनिल परब
शिवसेनेनं कधीही घोडेबाजार केलेला नाही, असं वक्तव्य शिवसेना नेते अनिल परब यांनी केलं आहे. मनसेच्या 6 नगरसेवकांनी घरवापसी केली आहे. राजकीय पोटदुखीमुळे भाजपाकडून घोडेबाजाराचा आरोप केला जात असल्याचंही अनिल परब म्हणाले आहेत. वडापाव खाऊन शिवसैनिक निष्ठेनं काम करतो. पैसे असते तर भाजपाची सत्ता उलथवली असती, असंही विधानही अनिल परबांनी केलं आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेचं संख्याबळ वाढल्यानं भाजपाला पोटदुखी झाल्याचंही ते म्हणाले आहेत.