Join us  

५८ कोटींचा आकडा कुठून आणला उद्धव ठाकरेंनी सांगावं, किरीट सोमय्या अखेर 'INS विक्रांत'वर बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 1:00 PM

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांतवरून केलेल्या आरोपांना भाजप नेते किरीट सोमय्यांनी उत्तर दिलं आहे.

मुंबई

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांतवरून केलेल्या आरोपांना भाजप नेते किरीट सोमय्यांनी उत्तर दिलं आहे. "मला पोलिसांकडून एफआयआर कॉपी उशिरा मिळाली. कॉपी वाचली तुम्हालाही हसू येईल. ५८ कोटींचा आकडा आणला कुठून हे उद्धव ठाकरेंनी सांगावं", असं किरीट सोमय्या म्हणाले. ते मुंबईत आज ईडीच्या कार्यालयाबाहेर पत्रकारांशी बोलत होते. 

जरंडेश्वर कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा यासाठी कारखान्याच्या काही सदस्यांसह किरीट सोमय्या आज ईडी कार्यालयात या संपूर्ण प्रकरणावर सविस्तर चौकशी करण्याचं विनंती पत्र घेऊन पोहोचले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. "अजित पवारांचा जर जरंडेश्वर कारखान्याशी संबंध नाही मग ते बोलतात कशाला?", असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. जरंडेश्वर कारखाना २७ हजार सदस्यांचा कारखाना आहे आणि तो शेतकऱ्यांना द्यावाच लागेल असंही ते म्हणाले. 

'INS विक्रांत'बाबत काय म्हणाले सोमय्या?आयएनएस विक्रांतसाठी जमा केलेले पैसे कुठे गेले यावर कोणतीही प्रतिक्रिया देणं किरीट सोमय्या यांनी सकाळी टाळलं होतं. सोमय्यांनी अगदी पाच मिनिटांत पत्रकार परिषद आटोपली होती. पत्रकारांच्या प्रश्नांना बगल देत ते कारमध्ये बसून निघून गेले होते. त्यानंतर दुपारी ईडीच्या कार्यालयाबाहेर बोलत असताना सोमय्या यांनी अखेर या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. 

"आयएनएस विक्रांतच्या प्रकरणावर पोलिसांनी दाखल केलेली एफआयआरची कॉपीच मला उशिरा मिळाली. ते कॉपी द्यायला मागत नव्हते. ती कॉपी जर तुम्ही वाचली तर हसू येईल. ज्या नागरिकानं तक्रार केली आहे. त्यानं एका बातमीत वाचलं की आयएनएस विक्रांतसाठी ५८ कोटी जमा केले. या आधारावर पोलिसांनी मला कोणतीही कल्पना न देता थेट ४२० चा गुन्हा कसा काय दाखल केला?", असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. 

"माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर मला हसू येतं. जर तुम्ही आरोप करत आहात. तर त्याची कागदपत्रं का देत नाही? ५८ कोटी हा आकडा आणला कुठून हे उद्धव ठाकरेंनी सांगावं. प्रत्यक्षात दीडदमडीचाही घोटाळा झालेला नाही", असं सोमय्या म्हणाले. 

टॅग्स :किरीट सोमय्याभाजपाउद्धव ठाकरे