पैशांची आमिषे दाखवून ‘खरेदी-विक्री’चा बाजार कोणी मांडला आहे? याचे खुलासे करायला नको - उद्धव ठाकरेंचं भाजपाला उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2017 07:59 AM2017-10-23T07:59:52+5:302017-10-23T08:10:45+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. मनसेचे मुंबई महानगरपालिकेतील 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावरुन शिवसेनेवर फोडाफोडीचा आरोप करण्यात येत आहे. या आरोपांना उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून उत्तर दिलं आहे. सध्या बक्कळ पैसा कुणाकडे आहे आणि खरेदी-विक्रीचा बाजार कुणी मांडला आहे याचे खुलासे करायची गरज नाही, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपाला प्रत्युत्तर दिले आहे.
काय आहे आजचे सामना संपादकीय?
राजकारण हे साधूसंतांचे राहिलेले नाही. एकमेकांच्या छाताडावर पाय देऊनच आता राजकारणात टिकाव धरावा लागतो. हे जरी आजच्या राजकारणाचे सत्य असले तरी शिवसेनेने इतक्या खालच्या पातळीवरील राजकारण कधी केले नाही आणि फक्त सत्तेसाठी वाट्टेल ते करायचे हा आमचा पिंडही नाही; पण शिवसेनेवर भलतेसलते आरोप केल्याशिवाय काही मंडळींच्या पिंडास कावळा शिवत नाही. किंबहुना शिवसेनाद्वेषावरच त्यांची रोजीरोटी टिकून असल्यामुळे त्यांचे कर्कश काव काव सुरूच असते. आताही मुंबई महानगरपालिकेतील सहा नगरसेवक एका चांगल्या विचाराने शिवसेनेत आले. मुंबई महापालिकेतील शिवसेनेची म्हणजे मराठी माणसाची सत्ता उखडून फेकण्याची भाषा ‘भाजपा’तील काही महाराष्ट्रद्रोहय़ांनी करताच हे नगरसेवक शिवसेनेच्या भगव्या झेंडय़ाखाली एकवटले. मराठी अस्मितेची ठिणगी त्यांच्या मनात धगधगत असल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतला. आम्ही यास फाटाफूट, तोडफोड किंवा पक्षांतर वगैरे मानायला तयार नाही, पण आता असा आरोप केला जातोय की, हे ‘मराठी अस्मिते’चे पाईक असलेले नगरसेवक पैशांसाठी फुटले! ‘‘शिवसेनेत येण्यासाठी नगरसेवक दिलीप लांडे यांनी म्हणे इतर नगरसेवकांना पैशाचे आमिष दाखवले. शिवसेनेत आलात तर बक्कळ पैसा देतो. बक्कळ म्हणजे किती? तर म्हणे आयुष्याला पुरेल इतका पैसा मिळेल,’’ अशी तक्रार एका नगरसेवकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे.
असा आरोप आता करणे हा एकप्रकारे ज्या मराठी अस्मितेसाठी त्या सहा नगरसेवकांनी निर्णय घेतला त्या मराठी अस्मितेचा अपमान आहे. मुळात सध्या राजकारणात कोणी कोणावर पैशांचे आणि फोडाफोडीचे आरोप करावेत, हा तसा प्रश्नच आहे. राजकारणात सध्या कोणत्या पक्षांची ‘तेजी’ आहे व पैशांची आमिषे दाखवून ‘खरेदी-विक्री’चा बाजार कोणी मांडला आहे याचे खुलासे आम्ही तरी करायला नकोत. जनता सर्व काही बघत आहे. सध्या राजकारणात ‘बक्कळ’ पैसा फक्त एकाच राजकीय पक्षाकडे आहे व त्याच पैशांचा वापर करून शिवसेनेचे पाय खेचण्याचे प्रयोग सुरू आहेत. नोटाबंदीनंतर जनतेच्या जीवनात ‘मंदी’चा फेरा आला असला तरी एकाच पक्षात ‘चांदी’ आहे व त्यामुळेच मणीपूरपासून गोव्यापर्यंत लोकांनी झिडकारले असतानाही फक्त ‘पैसा’ हेच हत्यार वापरून सत्ता मिळवली गेली. इतकेच कशाला, शिवसेनेने लोकहिताच्या प्रश्नांवर पाठिंबा काढून घेतला तरी सरकार पडणार नाही अशा ज्या बतावण्या केल्या जातात त्या फक्त ‘बक्कळ’ पैशांच्या जोरावरच ना? मग अशा बतावण्या करणाऱ्यांविरोधात एखादा राजकीय भामटा त्या ‘ईडी’कडे तक्रार खरडवायला जात नाही हे आश्चर्यच म्हणावे लागेल. त्यावर कोणी काही बोलत नाही, पण इतरांनी सत्ता टिकविण्यासाठी काही जंतरमंतर केले तर ती मात्र फोडाफोडी ठरवली जाते.
मुंबई महानगरपालिकेतून शिवसेनेची सत्ता खेचण्याच्या वल्गना या फक्त ‘बेपारी’ लोकांच्या पैशांवरच सुरू होत्या ना? महापालिकेतील मराठी माणसाची सत्ता उखडता आली नाही व तेथे पैशानेही सुरुंग लावता आला नाही याचा जो थयथयाट सुरू आहे, त्याचे भान यापुढे महाराष्ट्र नक्कीच ठेवेल. मुंबईतील १०५ हुतात्म्यांचे स्मारकही या मंडळींच्या डोळय़ात सध्या खुपू लागले आहे व हुतात्मा स्मारकाच्या बाबतीत त्यांच्या डोक्यात जे घाणेरडे किडे वळवळताना दिसत आहेत ते मनसुबे शिवसेना कदापि पूर्ण होऊ देणार नाही. १०५ हुतात्म्यांच्या आशीर्वादाने मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. ‘बेपारी’ मंडळींच्या पैशांवर भूलथापा मारून सत्ता मिळवायची व नंतर दिलेल्या आश्वासनांवर टांग वर करायची हे धंदे आम्ही कधीच केले नाहीत. प्रश्न इतकाच आहे की, ‘बक्कळ’ पैशांवर ज्यांचे फुटकळ राजकारण आज सुरू आहे व शिवसेनेसारख्या प्रखर हिंदुत्ववादी, अखंड महाराष्ट्रवादी पक्षाचा ‘काटा’ ज्यांच्या उरात सलतो आहे त्यांनी शिवसेनेला त्रास देण्यासाठी, बदनाम करण्यासाठी ‘बक्कळ’ तीर सोडले तरी ते त्यांच्यावर उलटतील. शिवसेनेच्या मतांत विभागणी करण्यासाठी मराठी मनात फूट पाडायची व त्याचा लाभ घेऊन विजयाचे घोडे दामटायचे या राजकारणास विटलेल्यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. शिवसेनेचे बळ वाढल्याचे दुःख काँग्रेस- राष्ट्रवादीस झाले नाही, पण ‘बक्कळ’ पैसेवाल्यांना ते झाले यातच सर्व काही आले! तेव्हा खुशाल करा तक्रारी! मराठी अस्मितेचा भगवा झेंडा मुंबईवर अखंड फडकतच राहणार आहे!!