भाजपात ‘बुजुर्ग’ नेत्यांपेक्षा त्यांच्या अस्थींना महत्त्व, उद्धव ठाकरेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 07:39 AM2018-08-27T07:39:35+5:302018-08-27T07:45:50+5:30
अटलबिहारी वाजपेयी अस्थिकलश यात्रेवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. ''अटलजींच्या निधनानंतर देशात जी शोकलहर निर्माण झाली त्या लहरीचा राजकीय व्यापार सुरू असल्याचे मत अटलजींच्या नातेवाईकांनीच व्यक्त केले, पण त्याहीपेक्षा गंभीर म्हणजे अटलजींच्या अस्थिकलशाचे हास्यदर्शन अस्वस्थ करून गेले म्हणून हा प्रपंच. असा हास्यप्रपंच पुन्हा कोणाच्याही बाबतीत घडू नये'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली आहे.
सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे :
- अटलबिहारी वाजपेयी यांच्या मृत्यूनंतर जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरण्याचे काम हास्यास्पद पद्धतीने सुरू आहे. अटलबिहारी वाजपेयींच्या अस्थिकलशाचे जे हास्यास्पद राजकारण सुरू झाले आहे ते कोणालाच शोभणारे नाही.
- भाजपात ‘बुजुर्ग’ नेत्यांना महत्त्व राहिलेले नाही, पण त्यांच्या अस्थींना महत्त्व मिळत आहे.
- आधी अंत्यसंस्कार मग त्या नेत्यांच्या अस्थिकलशांच्या उत्सवी मिरवणुका या एकवेळ मान्य केल्या तरी त्यांच्या विचारांचे काय? हेच प्रकार याआधी इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतरही घडले आहेत.
- अटलजींचा अस्थिकलश हाती घेऊन लोक खदाखदा हसू कसे शकतात? हे सर्व हास्यस्फोट कॅमेऱ्यात कैद झाले. काहींनी तर अटलजींच्या अस्थिकलशासोबत सेल्फी काढण्याचा ‘पराक्रम’ केला.
- सर्वच राजकीय पक्षांनी अटलजींचा अस्थिकलश स्वीकारून सन्मानाने आणि श्रद्धेने विसर्जित केला असता.
- पश्चिम बंगालात ममता, महाराष्ट्रात शिवसेना, ओडिशात नवीनबाबू, पंजाबात अकाली दल यांना सोबत घेता आले असते. यात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीही सामील झाले असते व अटलजींच्या लोकमान्य महानतेचे विराट दर्शन जगाला घडले असते.