चिता पेटत होती अन् सत्तातुर भुते सत्तेसाठी एकमेकांच्या मानगुटीवर बसत होती - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 09:11 AM2019-03-20T09:11:13+5:302019-03-20T09:53:14+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टीका केली आहे. गोव्यातील राजकारणावरुन शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे.

uddhav thackeray slams bjp over politics on goa chief minister | चिता पेटत होती अन् सत्तातुर भुते सत्तेसाठी एकमेकांच्या मानगुटीवर बसत होती - उद्धव ठाकरे

चिता पेटत होती अन् सत्तातुर भुते सत्तेसाठी एकमेकांच्या मानगुटीवर बसत होती - उद्धव ठाकरे

Next
ठळक मुद्देगोव्यातील राजकारणावरुन शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे. 'फक्त 19 आमदारांच्या बहुमतासाठी दोन उपमुख्यमंत्रीपदे बाहेरच्यांना देऊन गोव्यात सत्ता टिकवावी लागली. गोव्यात हे सर्व रात्री घडले. ‘रात्रीस खेळ चाले’ या राजकीय मालिकेचे चित्रीकरण जणू मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवाच्या साक्षीने सुरू होते' 'चिता पेटत होती व सत्तातुर भुते सत्तेसाठी एकमेकांच्या मानगुटीवर बसत होती'.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टीका केली आहे. गोव्यातील राजकारणावरुन शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे. 'फक्त 19 आमदारांच्या बहुमतासाठी दोन उपमुख्यमंत्रीपदे बाहेरच्यांना देऊन गोव्यात सत्ता टिकवावी लागली. गोव्यात हे सर्व रात्री घडले. ‘रात्रीस खेळ चाले’ या राजकीय मालिकेचे चित्रीकरण जणू मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवाच्या साक्षीने सुरू होते' असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

'चिता पेटत होती व सत्तातुर भुते सत्तेसाठी एकमेकांच्या मानगुटीवर बसत होती. निदान चार तास थांबायला हरकत नव्हती, पण सकाळपर्यंत काँग्रेसने ढवळीकर, सरदेसाईंना गळाला लावले तर काय करायचे? या भयातून रात्रीच खेळ उरकून टाकला गेला. गोव्याची जनता तरी हतबलतेशिवाय काय करणार? आम्ही फक्त सहानुभूतीचा उसासा सोडू शकतो' अशा शब्दात शिवसेनेने गोव्यातील राजकारणावर नाराजी व्यक्त केली आहे. 'मनोहर पर्रीकर यांचे पार्थिव अनंतात विलीन झाले, पण त्यांच्या देहाची राख गोमंतकच्या भूमीत विलीन होण्याआधीच सत्ता-खुर्चीचा लाजीरवाणा खेळ सुरू झाला होता. अखेर हपापलेल्या बोक्याप्रमाणे आपापला वाटा घेऊन हा खेळ सोमवारी मध्यरात्रीनंतर संपला' असे अग्रलेखात म्हटले आहे.

'आमच्या कोणत्याही राज्यात उपमुख्यमंत्रीपद नसेल, असे चार वर्षांपूर्वी भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने जाहीर केले होते व महाराष्ट्रात शिवसेनेस उपमुख्यमंत्रीपद मिळू दिले गेले नाही. मात्र नंतर बिहारात एक, उत्तर प्रदेशात दोन उपमुख्यमंत्री नेमण्यात आले. जम्मू-कश्मीरातही भाजपने उपमुख्यमंत्रीपद घेतले व आता फक्त 19 आमदारांच्या बहुमतासाठी दोन उपमुख्यमंत्रीपदे बाहेरच्यांना देऊन गोव्यात सत्ता टिकवावी लागली. गोव्यात हे सर्व रात्री घडले' असे ही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

सामनाचा आजचा अग्रलेख

- मनोहर पर्रीकर यांचे पार्थिव अनंतात विलीन झाले, पण त्यांच्या देहाची राख गोमंतकच्या भूमीत विलीन होण्याआधीच सत्ता-खुर्चीचा लाजीरवाणा खेळ सुरू झाला होता. अखेर हपापलेल्या बोक्याप्रमाणे आपापला वाटा घेऊन हा खेळ सोमवारी मध्यरात्रीनंतर संपला. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून सोमवारी मध्यरात्री प्रमोद सावंत यांनी शपथ घेतली, तर विजय सरदेसाई व सुदिन ढवळीकर हे दोन उपमुख्यमंत्री म्हणून नेमले जाणार आहेत. लोकशाहीचा हा खेळखंडोबाच म्हणावा लागेल. पर्रीकरांच्या चितेची आग विझेपर्यंत तरी थांबायला हवे होते.  

- सोमवार मध्यरात्रीऐवजी मंगळवारची सकाळ उजाडली असती तर गोव्यावर असा कोणता डोंगर कोसळणार होता? पर्रीकर यांच्या निधनाने हा डोंगर आधीच कोसळला आहे व त्यांच्या पार्थिवावर वाहण्यात आलेल्या फुलांचे अद्याप निर्माल्य झालेले नाही, पण बकासुराप्रमाणे सत्तासुरांची वखवख वाढल्याने रात्रीच्या अंधारात सर्वकाही उरकून घेतले गेले. 

- मंगळवारची पहाट उगवली असती तर कदाचित भाजपचे सरकार उडाले असते व ज्यांनी उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथा घेतल्या त्यातल्या एखाद्याने काँग्रेसच्या वळचणीला जाऊन हवे ते पदरात पाडून घेतले असते. मनोहर पर्रीकर यांच्या तोडीचा दुसरा नेता गोव्यातील भाजपात तयार होऊ शकला नाही. त्यामुळे या तडजोडी कराव्या लागत आहेत.

- 40 सदस्यांच्या विधानसभेत तीन जागा रिकाम्या आहेत. पर्रीकर यांच्या निधनामुळे आणखी एक जागा रिकामी झाली. भाजपचे फक्त 12 आमदार आहेत. भाजपपेक्षा काँग्रेस आमदारांचा आकडा मोठा आहे व पर्रीकरांची प्रकृती ढासळत असतानाच काँग्रेसने राज्यपालांकडेसत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यामुळे भाजपची चिंता समजू शकतो. 

- काँग्रेसचे आमदार 14, पण मुख्यमंत्रीपदासाठीचे दावेदार ‘सतरा’ असा घोळ असल्याने भाजपचे फावले. सरकार स्थापनेसाठी 19 आमदारांची गरज असल्याने गोवा फॉरवर्ड व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या प्रत्येकी तीन आमदारांचा व तीन अपक्षांचा पाठिंबा भाजपला मिळवावा लागला. आता विधानसभेत बहुमत आहे, पण सरकार किती टिकेल हा प्रश्न आहे.  

- विजय सरदेसाई किंवा मगोचे सुदिन ढवळीकर यांच्या भूमिका व निष्ठा संशयास्पद आहेत. रात्रीच्या अंधारातच नव्हे तर दिवसाढवळय़ा नवा डाव मांडायला ते मागेपुढे पाहणार नाहीत. ढवळीकर यांना जसे एकदा मुख्यमंत्री व्हायचे आहे, तसे विजय सरदेसाई यांनाही व्हायचे आहे. भाजपास नव्याने पाठिंबा हवा असेल तर आमच्या तीनही आमदारांना मंत्री करा, अशी अट ढवळीकर यांनी टाकली व शेवटी स्वतः उपमुख्यमंत्रीपद घेऊन त्यांचा बंडोबा थंडोबा झाला. 

- विजय सरदेसाई यांचा कांगावा असा की, ‘आमचा पाठिंबा फक्त पर्रीकरांना होता, भाजपास नव्हता. त्यामुळे मला मुख्यमंत्री करा.’ पण सरदेसाई यांनीही उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले आहे. फक्त 19 आमदारांत हा खेळ सुरू आहे व गोव्याची देवभोळी जनता ही राजकीय भुताटकी हतबलतेने सहन करते आहे. आजही गोव्यातील जनता शोकात आहे व माजी संरक्षणमंत्री असलेल्या पर्रीकरांच्या निधनाने एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा सुरू होता आणि राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरला असल्याचे भानही सत्तासुरांना नव्हते. 

- काँग्रेसमधून बेडूकउडी मारलेले विश्वजीत राणे व प्रदेश अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनाही मुख्यमंत्री व्हायचे होते, पण नितीन गडकरी यांनी प्रमोद सावंत यांचे नाव पक्के केले.प्रमोद सावंत हे तरुण आहेत व त्यांचा राजकीय अनुभव तोकडा आहे. आयाराम – गयारामांच्या टोळय़ांना सांभाळत त्यांना मुख्यमंत्री म्हणून गोव्याचे राज्य सांभाळायचे आहे. त्यामुळे गोव्यात नवीन मुख्यमंत्र्यांनी आपले पाय सुरक्षित आणि घट्ट ठेवावेत. खेचाखेची कधीही होऊ शकते. फक्त 19 आमदारांत दोन उपमुख्यमंत्री नेमावे लागावेत ही नामुष्की आहे. 

- आमच्या कोणत्याही राज्यात उपमुख्यमंत्रीपद नसेल, असे चार वर्षांपूर्वी भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने जाहीर केले होते व महाराष्ट्रात शिवसेनेस उपमुख्यमंत्रीपद मिळू दिले गेले नाही. मात्र नंतर बिहारात एक, उत्तर प्रदेशात दोन उपमुख्यमंत्री नेमण्यात आले. जम्मू-कश्मीरातही भाजपने उपमुख्यमंत्रीपद घेतले व आता फक्त 19 आमदारांच्या बहुमतासाठी दोन उपमुख्यमंत्रीपदे बाहेरच्यांना देऊन गोव्यात सत्ता टिकवावी लागली. गोव्यात हे सर्व रात्री घडले. 

- ‘रात्रीस खेळ चाले’ या राजकीय मालिकेचे चित्रीकरण जणू मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवाच्या साक्षीने सुरू होते. चिता पेटत होती व सत्तातुर भुते सत्तेसाठी एकमेकांच्या मानगुटीवर बसत होती. निदान चार तास थांबायला हरकत नव्हती, पण सकाळपर्यंत काँग्रेसने ढवळीकर, सरदेसाईंना गळाला लावले तर काय करायचे? या भयातून रात्रीच खेळ उरकून टाकला गेला. गोव्याची जनता तरी हतबलतेशिवाय काय करणार? आम्ही फक्त सहानुभूतीचा उसासा सोडू शकतो.

Web Title: uddhav thackeray slams bjp over politics on goa chief minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.