Join us  

'मी पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणतात, मला जाऊ द्या ना घरी, वाजवले की बारा...'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 9:33 PM

'लोकशाही वाचवणारे आतंकवादी असतील, तर मी आतंकवादी आहे."

Shiv Sena Uddhav Thackeray : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात ठाकरेंच्या शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजप आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. 'केंद्रातील हे सरकार पडले पाहिजे, पुन्हा निवडणुका झाल्या पाहिजे. पडले, तर आम्ही इंडिया आघाडीसोबत सरकार स्थापन करू,' असा घणाघात यावेळी ठाकरेंनी केला.

भाजपसोबत जायचं का? उद्धव ठाकरे पुढे म्हणतात, 'लोकसभेत शिवसेनेला मिळालेले यश फक्त माझ्यामुळे नाही. मी शून्य आहे, यशाचे खरे धनी तुम्ही आहात. आत्मविश्वास असेल तर जगाच्या कोपऱ्यात कुठेही जा, तुम्हाला कुणी रोखू शकत नाही. पण आत्मविश्वास आणि अहंकार यामध्ये फरक आहे. अहंकार जो मोदीमध्ये आहे आणि आत्मविश्वास आमच्यात आहे. निवडणुकीनंतर चर्चा सुरू केल्या की, उद्धव ठाकरे मोदींसोबत जाणार आहेत. ज्यांनी मातेसमान शिवसेनेला फोडले, त्या नालायकांसोबत परत जायचे का?' असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना केला. त्यावर सर्वांना नाही, असे उत्तर दिले.

पुन्हा येईन म्हणणारे म्हणतात...यावेळी ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही बोचरी टीका केली. 'आजकाल पुन्हा येईन, पुन्हा येईन म्हणणारे काय म्हणतायत? जाऊद्या ना घरी, आता वाजवले की बारा...आता एवढे बारा वाजवले आहेत की...'असे म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. यावेळी उद्धव यांनी राज ठाकरेंना नाव न घेता टोला लगावला. 'मला विरोध करण्यासाठी काहींनी उघड, म्हणजेच बिनशर्ट पाठिंबा दिला', असे म्हणत उद्धव यांनी राज ठाकरेंवर हल्ला केला.

तुम्हीच खरे नक्षलवादी आहात...'काही संस्थांनी लोकशाही वाचवण्यासाठी इंडिया आघाडीला पाठिंबा दिला, काही युट्युबरनेही प्रचार केला. तर मिंध्ये बोलले, हा शहरी नक्षलवाद आहे. हुकूमशाही तोडाफोडा आणि लोकशाही वाचवा हा प्रचार नक्षलवाद वाटतो. लोकशाही वाचवा हा आतंकवाद असेल, तर मी आतंकवादी आहे. तुमचे बापजादे दिल्लीत बसले आहेत. मोदी-शाह सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करतात. कार्यकर्त्यांच्या घरी ईडी सीबीआयला पाठवता. अमोलला पाडणारा गद्दार निर्लज्जपणे सांगतो माझ्याकडे पर्यायच नव्हता, नाही तर तुरुंगात गेलो असतो. तुम्ही दमदाट्या देऊन तुरुंगात टाकता, दहशत निर्माण करता, हा तुमचा सरकारी नक्षलवाद नाही का? सत्तेचा दुरुपयोग करणे, हा शहरी नक्षलवादापेक्षा भयानक आहे. तुम्ही खरे नक्षलवादी आहात, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

चंद्राबाबू आणि नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का?'आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडल्याचा प्रचार ते डोमकावळे करत बसले आहेत. मी हिंदुत्व सोडलेलं नाही. देशभक्तांनी संविधान आणि देश वाचवण्यासाठी मला मतदान केले आहे,' असा दावाही त्यांनी यावेळी केला. नरेंद्र मोदींनीच सत्तेसाठी हिंदुत्व सोडले आहे. आज भाजपाबरोबर कोण बसले आहेत? चंद्राबाबू आणि नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का? आंध्रात चंद्राबाबूंनी मुस्लीम समाजाला आश्वासने दिलेली नाहीत का? नितीश कुमारांनी मुस्लीम समाजाला आश्वासने दिलेली नाहीत का? मुस्लीम समाज आमच्याबरोबर आहे, कारण आम्ही तुमच्यासारखे पाठीत वार करत नाही,' अशी घणाघाती टीकाही त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :उद्धव ठाकरेएकनाथ शिंदेशिवसेनादेवेंद्र फडणवीस