'राजकीय अतिसाराने सत्ताधार्‍यांची बुद्धी व मन गोठले', 'सामना'तून भाजपावर सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 08:12 AM2019-02-11T08:12:45+5:302019-02-13T09:47:56+5:30

महाराष्ट्रात 48 पैकी 43 जागा जिंकण्याचा ‘तोडगा’ यांच्यापाशी आहे. जनता मरू द्या, राज्य खाक होऊ द्या, पण राजकारण टिकले पाहिजे. याला पाडू, त्याला पाडू असे सध्या सुरू आहे. याच धुंदीत उद्या हे स्वतःच कोसळतील, तरीही यांचा गिरे तो भी टांग उपर या पद्धतीने कारभार सुरूच राहील.

uddhav thackeray slams devendra fadnavis over 43 seats in maharashtra | 'राजकीय अतिसाराने सत्ताधार्‍यांची बुद्धी व मन गोठले', 'सामना'तून भाजपावर सडकून टीका

'राजकीय अतिसाराने सत्ताधार्‍यांची बुद्धी व मन गोठले', 'सामना'तून भाजपावर सडकून टीका

googlenewsNext
ठळक मुद्देसत्ता कोणाला नको आहे? राजकारण करणार्‍या सगळ्यांनाच ती हवी आहे, पण चोवीस तास त्याच नशेत राहून झिंगणे व झिंगल्यासारखे तर्राट बोलणे हे बरे नाही असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.महाराष्ट्रात 48 पैकी 43 जागा जिंकण्याचा ‘तोडगा’ यांच्यापाशी आहे. जनता मरू द्या, राज्य खाक होऊ द्या, पण राजकारण टिकले पाहिजे. याला पाडू, त्याला पाडू असे सध्या सुरू आहे. याच धुंदीत उद्या हे स्वतःच कोसळतील, तरीही यांचा गिरे तो भी टांग उपर या पद्धतीने कारभार दुष्काळग्रस्त महाराष्ट्राच्या तोंडास केंद्राने पाने पुसली. त्यावर जोरात बोलायचे सोडून ‘‘याला पाडा, त्याला गाडा’’ हेच पालुपद सुरू आहे.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर सडकून टीका केली आहे. सत्ता कोणाला नको आहे? राजकारण करणार्‍या सगळ्यांनाच ती हवी आहे, पण चोवीस तास त्याच नशेत राहून झिंगणे व झिंगल्यासारखे तर्राट बोलणे हे बरे नाही असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

महाराष्ट्रात 48 पैकी 43 जागा जिंकण्याचा ‘तोडगा’ यांच्यापाशी आहे. जनता मरू द्या, राज्य खाक होऊ द्या, पण राजकारण टिकले पाहिजे. याला पाडू, त्याला पाडू असे सध्या सुरू आहे. याच धुंदीत उद्या हे स्वतःच कोसळतील, तरीही यांचा गिरे तो भी टांग उपर या पद्धतीने कारभार सुरूच राहील. थंडीने दवबिंदू गोठतात तसे राजकीय अतिसाराने सत्ताधार्‍यांची बुद्धी व मन गोठले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

काय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात 

- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आत्मबलाचे कौतुक करावे तेवढे थोडेच. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत पुणे मुक्कामी श्री. फडणवीस यांनी नारा दिला आहे की, ‘‘गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्ही 42 जागा जिंकल्या होत्या. यावेळी आम्ही कुठल्याही परिस्थितीत 43 जागा जिंकू.’’ फडणवीस यांचा असाही दावा आहे की, यावेळी आम्ही बारामतीत पवारांचा पाडाव करू. यावर पवारांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे भाजपास शुभेच्छा दिल्या आहेत. खरे तर महाराष्ट्रातील पैकीच्या पैकी म्हणजे 48 जागा हे लोक सहज जिंकू शकतात व देशात स्वबळावर 548 जागा कुठेच गेल्या नाहीत.

- ‘ईव्हीएम’ आणि असा हा फसफसणारा आत्मविश्वास सोबतीला असताना लंडन, अमेरिकेतही ‘कमळ’ फुलू शकेल, पण त्याआधी अयोध्येत राममंदिराचे कमळ का फुलले नाही? याचे उत्तर द्या. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नाहीत, पण ‘‘याला पाडू, त्याला पाडू, त्याला गाडू’’ वगैरे भाषा सध्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत सुरू आहेत. पाडापाडीची भाषा यांच्या तोंडात इतकी रुळली आहे की, एखाद दिवस ‘स्लिप ऑफ टंग’ होऊन स्वतःच्याच अमुक-तमुक लोकांना पाडू असे यांच्या तोंडून बाहेर पडू नये म्हणजे झाले. राज्यकर्त्या पक्षात जो संयम, विनम्र भाव असायला हवा तो अलीकडच्या काळात नष्ट झाला आहे. एक प्रकारची राजकीय बधिरता निर्माण झाली आहे. विरोधी पक्ष बेलगाम बोलतो हे मान्य, पण म्हणून सत्ताधारी पक्षानेही असे बेलगाम बोलू नये.

- महाराष्ट्रात थंडीच्या लाटेने पिकांवर बर्फाचा थर साचला आहे. अनेक भागात दवबिंदू गोठले आहेत. त्याप्रमाणे सत्ताधार्‍यांची बुद्धीच थंडीने गोठली व राजकारण बिघडले असे काही झाले आहे काय? शेतकरी आज संकटात आहे. दुष्काळग्रस्त महाराष्ट्राच्या तोंडास केंद्राने पाने पुसली. त्यावर जोरात बोलायचे सोडून ‘‘याला पाडा, त्याला गाडा’’ हेच पालुपद सुरू आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे प्रकरण लटकलेल्या अवस्थेत आहे, पण ही स्थिती आम्ही निर्माण केली नसून 2014 साली या पापाची बीजे भाजपने रोवली आहेत.

- सत्ता येते, सत्ता जाते. लाटा येतात, लाटा विरून जातात. लोकशाहीत अपघात होत असतात, पण लोकशाही व्यवस्थेत अपघातातून मार्ग काढण्याचे काम जनतेलाच करावे लागते. गेल्या 70 वर्षांत जनतेने हे कार्य नेटाने केले आहे. एखाद्या अपघातात धडधाकट, कर्त्यासवरत्या माणसाची स्मृती जाते, तशाच एखाद्या अपघातात ‘झटका’ बसून गेलेली स्मृती परत येते असे विज्ञान सांगते.

- सत्ता कोणाला नको आहे? राजकारण करणार्‍या सगळ्यांनाच ती हवी आहे, पण चोवीस तास त्याच नशेत राहून झिंगणे व झिंगल्यासारखे तर्राट बोलणे हे बरे नाही. निवडणुका लढविण्यासाठीच जणू आपला जन्म झालाय व दुसरे कुणी निवडणुकीत उतरायच्या पात्रतेचेदेखील नाहीत असा अहंकारी फूत्कार महाराष्ट्राचे समाजमन गढूळ करीत आहे. राज्यात काय कमी प्रश्न आहेत की, मुख्यमंत्री ते सर्व सोडून निवडणूक लढण्या–जिंकण्याचे जाळे विणत बसले आहेत. एका बाजूला 48 पैकी 43 जागा जिंकण्याची आरोळी ठोकायची व दुसर्‍या बाजूला शिवसेनेसोबत हिंदुत्वाच्या मुद्यावर ‘युती’ व्हायलाच पाहिजे असे बोलायचे. एकदा नक्की काय करायचे ते ठरवा. भरकटल्यासारखे बोलत राहिल्याने लोकांतील उरलीसुरली पतही निघून जाईल.

- काय जिंकायचे ते जिंका, पण महाराष्ट्रातील गंभीर प्रश्नांचे काय? नगर जिल्ह्यातील पुणतांबे येथे शेतकर्‍यांच्या मुलींनी आंदोलन सुरू केले. उपोषणास बसल्या या कन्या. ते आंदोलन चिरडण्यासाठी जे सरकार पोलिसी बळाचा वापर करते त्यांच्या तोंडी जिंकण्याची भाषा शोभत नाही. शेतकर्‍यांच्या लेकी-सुनांनाही गाडा हाच संदेश सरकार देत आहे. कांद्याला फक्त साडेसात पैसे भाव मिळत आहे. दुधावरील जीएसटीने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अनाथाश्रमांच्या दत्तक केंद्रांमध्ये गेल्या चार वर्षांत एक हजारावर बालकांचा मृत्यू झाला आहे.

- राज्यात शिक्षकांच्या 24 हजार जागा रिकाम्या आहेत. त्या भराव्यात म्हणून शिक्षकवर्ग उपोषणाला बसला आहे. यापैकी एकाही प्रश्नावर सरकारकडे तोडगा नाही, पण महाराष्ट्रात 48 पैकी 43 जागा जिंकण्याचा ‘तोडगा’ यांच्यापाशी आहे. जनता मरू द्या, राज्य खाक होऊ द्या, पण राजकारण टिकले पाहिजे. याला पाडू, त्याला पाडू असे सध्या सुरू आहे. याच धुंदीत उद्या हे स्वतःच कोसळतील, तरीही यांचा गिरे तो भी टांग उपर या पद्धतीने कारभार सुरूच राहील. थंडीने दवबिंदू गोठतात तसे राजकीय अतिसाराने सत्ताधार्‍यांची बुद्धी व मन गोठले आहे.

Web Title: uddhav thackeray slams devendra fadnavis over 43 seats in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.