मुंबई - राज्य मनाने दुभंगले आहे. एकंदरीत फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र समृद्धीच्या महामार्गाने जाताना दिसत नसून तो जातीय अराजक व विनाशाच्या खड्ड्यात पडताना दिसत आहे अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर टीका केली आहे. कोरेगाव-भीमा प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात झालेली जाळपोळ, तोडफोडीच्या मुद्यावरुन सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यात आले आहे. १८१८ मध्ये भीमा-कोरेगावात पेशव्यांचा पराभव झाला. तो पराभव छत्रपतींच्या राज्याचा होता. फडणवीस, मग आता तरी वेगळे काय झाले आहे? असा सवाल विचारण्यात आला आहे.
महाराष्ट्र बंद पुकारणारे प्रकाश आंबेडकर आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावरही अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेला ‘बंद’ शांततेत पार पाडला असता तर एक पुढारी म्हणून त्यांचे वजन नक्कीच वाढले असते. तसे झाले नाही. उलट बौद्ध समाजातील काही भडक डोक्याचे लोक प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अधिकच दिशाहीन झाले आहेत व ते आता नक्षलवाद्यांची भाषा बोलू लागले आहेत असे म्हटले आहे.
रामदास आठवले यांना ‘टार्गेट’ करण्याचे कारस्थान असल्याचा आरोप अविनाश महातेकरांसारखे नेते करतात तेव्हा आश्चर्य वाटते. कारण बौद्ध समाज रस्त्यावर उतरला तेव्हा आठवलेंपासून महातेकरांपर्यंत एकही नेता लोकांना शांत करण्याच्या भूमिकेत नव्हता. महाराष्ट्र जळत असताना ‘भाजप’चे ‘जी हुजूर’ झालेले रामदास आठवले हे दिल्लीच्या थंडीत गारठून गेले होते अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात - कुठे दलित समाज ‘बंद’ पुकारीत आहे तर कुठे हिंदुत्ववादी संघटना मोर्चे काढत आहेत. एकंदरीत फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र समृद्धीच्या महामार्गाने जाताना दिसत नसून तो जातीय अराजक व विनाशाच्या खड्ड्यात पडताना दिसत आहे. राज्य मनाने दुभंगले आहे. १८१८ मध्ये भीमा-कोरेगावात पेशव्यांचा पराभव झाला. तो पराभव छत्रपतींच्या राज्याचा होता. फडणवीस, मग आता तरी वेगळे काय झाले आहे? उथळ राजकारणाला उकळी फुटली आहे, सावधान!
- महाराष्ट्रात सर्व काही आलबेल आहे असे ज्यांना वाटते ते मूर्खांच्या नंदनवनात विहार करीत आहेत. तिसऱ्या दिवशीही काही ठिकाणी आगी पेटल्या, तर काही ठिकाणी आधीच पेटवलेल्या आगीचा धूर निघत आहे. दगडफेक आणि रस्त्यावर येऊन वाहतुकीचा खोळंबा करण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेला ‘बंद’ शांततेत पार पाडला असता तर एक पुढारी म्हणून त्यांचे वजन नक्कीच वाढले असते. तसे झाले नाही. उलट बौद्ध समाजातील काही भडक डोक्याचे लोक प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अधिकच दिशाहीन झाले आहेत व ते आता नक्षलवाद्यांची भाषा बोलू लागले आहेत. कोल्हापूरच्या रुकडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना काही भडक डोक्याच्या लोकांनी केली. त्यातून त्या भागात तणाव वाढला आहे. कुठे दलित समाज ‘बंद’ पुकारीत आहे तर कुठे हिंदुत्ववादी संघटना मोर्चे काढत आहेत. एकंदरीत फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र समृद्धीच्या महामार्गाने जाताना दिसत नसून तो जातीय अराजक व विनाशाच्या खड्ड्यात पडताना दिसत आहे.
- या क्षणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आहोत. कारण प्रश्न महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा आणि सुव्यवस्थेचा आहे. ‘‘भीमा-कोरेगावची दंगल ही फक्त सुरुवात आहे व खरा चित्रपट बाकी आहे’’ अशा घोषणा दिल्या जात आहेत. आमच्या माहितीप्रमाणे राज्यात अनेक ठिकाणी निर्माण झालेल्या खदखदीचा भडका उडावा व त्यात महाराष्ट्र बेचिराख व्हावा यासाठी हालचाली सुरू आहेत. दलित समाजाला उचकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुन्हा रामदास आठवले यांना ‘टार्गेट’ करण्याचे कारस्थान असल्याचा आरोप अविनाश महातेकरांसारखे नेते करतात तेव्हा आश्चर्य वाटते. कारण बौद्ध समाज रस्त्यावर उतरला तेव्हा आठवलेंपासून महातेकरांपर्यंत एकही नेता लोकांना शांत करण्याच्या भूमिकेत नव्हता व समाजही या नेत्यांचे ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. महाराष्ट्र जळत असताना ‘भाजप’चे ‘जी हुजूर’ झालेले रामदास आठवले हे दिल्लीच्या थंडीत गारठून गेले होते. राज्यात पेटलेल्या शेकोटीचे चटके आज त्यांना उबदार वाटत असले तरी प्रकाश आंबेडकर यांनी बौद्ध समाजात पेरलेले सुरुंग फुटू लागले आहेत व आंबेडकरी जनतेचे ऐक्य पुन्हा एकदा फुटीच्या कड्यावर आहे.
- मुख्यमंत्री संयमाने वागले याचे कौतुक सुरू आहे, पण हा संयम ते इतर वेळी दाखवत नाहीत. दंगलखोरांचा बीमोड करण्यासाठी त्यांनी जो संयम दाखवला, त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे शेकडो कोटींचे नुकसान झाले. डबघाईस आलेल्या एसटीचेच २५ कोटींचे नुकसान झाले. जिथे संयम दाखवायला हवा तिथे शौर्य दाखवायचे व शौर्याची तुतारी फुंकायची तिथे संयम दाखवायचा याला राज्य करणे म्हणत नाहीत. या सर्व दंगल प्रकरणातून भारतीय जनता पक्षाला राजकीय लाभ होईल की आणखी कुणाचे राजकीय भले होईल या हिशोबाची ही वेळ नाही. महाराष्ट्राचे गृहखाते एकसंध राहिलेले नाही व तिथे राजकीय फायद्यातोट्याच्या गणिताचा तास सुरू झाला आहे. गृहखाते हा राज्याचा आणि देशाचा कणा असतो. तोच ठिसूळ झाला तर राज्य मोडून पडेल. प्रकाश आंबेडकर यांनी आता मुख्यमंत्र्यांसमोर नव्या अटी व शर्ती ठेवल्या आहेत, ‘‘बंद’च्या काळात हिंसाचार करणाऱ्यांची क्लिप पोलिसांकडे असेल तर त्यांनी ती आम्हाला सादर करावी. या यादीतील लोकांना आम्ही हजर करू. मात्र पोलिसांनी धरपकड करू नये.’’ मुख्यमंत्र्यांनी आपली ही ‘अट’ मान्य केल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. हे सत्य असेल तर आम्ही प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे अभिनंदन करीत आहोत. कारण त्यांनी राजकीय आंदोलकांना नवे दालन उघडून दिले आहे. महाराष्ट्राच्या गृहखात्यावरचा भारही त्यामुळे हलका होईल व राज्याचे गृहखाते राजकीय चिंतन शिबिरात सहभागी व्हायला मोकळे होईल. राज्य मनाने दुभंगले आहे. १८१८ मध्ये भीमा-कोरेगावात पेशव्यांचा पराभव झाला. तो पराभव छत्रपतींच्या राज्याचा होता. फडणवीस, मग आता तरी वेगळे काय झाले आहे? उथळ राजकारणाला उकळी फुटली आहे, सावधान!