Uddhav Thackeray On Ram Mandir ( Marathi News ) :राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा जवळ येऊ लागल्यानंतर या मुद्द्यावरून राजकीय वातावरणही तापू लागलं आहे. राम मंदिर आंदोलनावरून भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचं योगदान फडणवीसांकडून नाकारलं जात आहे. शिवसेनाप्रमुखांबद्दल, शिवसेनेच्या योगदानाबद्दल हे बोलू शकतात म्हणजेच यांची मानसिकता कशी आहे हे लोकांना कळत असून देवेंद्र फडणवीसांनीच त्यांच्या ढोंगीपणाचा बुरखा स्वतःहून उतरवला, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. त्यांच्या वजनानं बाबरी कोसळली असेल तर माहीत नाही. पण त्यांचे नेते सुंदरलाल भंडारी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी दिलेल्या विविध मुलाखतींमधील प्रतिक्रिया फडणवीसांनी पाहावी. साहजिकच त्यांचा गृहपाठ कमी पडतोय," असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी केला आहे. राम मंदिर सोहळ्याच्या निमंत्रणावरूनही सध्या वादंग सुरू आहे. याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "आम्हाला अद्याप निमंत्रण मिळालेलं नाही. मात्र आम्ही कधीही जाऊन दर्शन घेऊ शकतो. मी मुख्यमंत्री असताना, त्यापूर्वीही आयोध्येत जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतलं आहे, त्यामुळे आयोध्येत जाऊन कधीही दर्शन घेईन." राम मंदिर होत असल्याचा आनंद व्यक्त करत उद्धव यांनी म्हटलं की, "अयोध्येमध्ये राममंदिर होणं ही आनंदाची गोष्ट आहे. कारण त्याच्यासाठी शिवसेनेनं खूप मोठा संघर्ष केला आहे. शिवसेनाप्रमुखांनी राममंदिर आणि हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून त्यांचा मतदानाचा अधिकार हिसकावून घेण्यात आला होता. राममंदिरासाठी अनेक शिवसैनिक-कारसेवकांनी रक्त साडंलेलं आहे."
"राम मंदिर उद्घाटनाचा 'पॉलिटिकल इव्हेंट' होऊ नये, हीच माझी अपेक्षा आहे. बाकी आम्हा सगळ्यांना आणि हिंदूंना आनंद झाला आहे. आम्हाला वाटलं होतं, युतीचं सरकार आल्यानंतर खास कायदा करुन राम मंदिर बांधण्यात येईल, पण तसं झालं नाही. सर्वोच्च न्यायालयानं तो निर्णय दिला आणि त्यानंतर राम मंदिर बांधण्यात आलं आहे. इतर कुणी दिले असतील, पण शिवसेनेनं त्या मंदिरासाठी पक्षनिधीतून १ करोडचा निधी दिला आहे," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
"ते फडणवीसांनी सांगण्याची गरज काय?"
ज्याच्या मनात राम आहे, त्यांना निमंत्रणाची गरज नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं. फडणवीसांच्या या वक्तव्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "मनात राम असेल तर ते फडणवीसांनी सांगण्याची गरज काय? राम मंदिर नसतानाही लाखो भाविक आयोध्येत जातच होते. जाणं-न जाणं यात राजकारणाचा भाग नाही, त्यामुळे त्यांनी फुशारक्या मारु नयेत," अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला.