भर पावसात काळ्या फिती लावून ठाकरे कुटुंब आंदोलनात; उद्धव ठाकरेंची महायुतीवर बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 03:30 PM2024-08-24T15:30:47+5:302024-08-24T15:34:58+5:30
Shiv Sena Uddhav Thackeray Group: आपल्या बहिणीची सुरक्षा करावीच लागेल. या सरकारला घालवावे लागेल, असे सांगत उद्धव ठाकरेंनी भर पावसात उपस्थितांना संबोधित करत महायुतीवर टीकास्त्र सोडले.
Shiv Sena Uddhav Thackeray Group: बदलापूर घटनेचे तीव्र पडसाद अद्यापही उमटताना दिसत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला होता. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर ठरवत, असा बंद करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर महाविकास आघाडीने संप मागे घेतला. परंतु, याविरोधात निदर्शने करणार असल्याचे स्पष्ट केले. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, तर मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे नेते काळी पट्टी लावून निदर्शने केली. उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अरविंद सावंत यांच्यासह ठाकरे गटाचे अनेक नेते पदाधिकारी यांनी सेना भवन येथे निदर्शने केली.
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली. भर पावसात बदलापूर घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी हजारो शिवसैनिक सेना भवनाबाहेर जमले. तीव्र शब्दांत सत्ताधारी सरकारचा निषेध यावेळी करण्यात आला. या निषेध आंदोलनात ठाकरेंचे कुटुंबीय सहभागी झालेले दिसले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर बोचऱ्या शब्दांत टीका केली.
कंसमामा राख्या बांधत फिरतायत
सरकारकडून सर्व दार बंद झाली की, रस्त्यावर उतरावे लागते. संकटाचा सामना करण्याची हिंमत नाही. हे निर्ढावलेले सरकार आहे. चेले चपाटे न्यायालयात पाठवून आम्ही पुकारलेल्या बंदला विरोध केला. आम्ही न्यायालयात गेलो आहोत. न्याय कधी मिळेल ही आशा आहे. शुक्रवारी न्यायालयाने तात्काळ निर्णय दिला. एका बाजूला बहिणीवर अत्याचार होत आहे आणि दुसऱ्या बाजूला कंसमामा राख्या बांधत फिरतायत, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर हल्लाबोल केला.
‘बहीण सुरक्षित, घर सुरक्षित’ अशी स्वाक्षरी मोहीम घ्या
हे आंदोलन विकृती विरुद्ध संस्कृतीचे आहे. या सरकारला घालवावे लागेल. आपल्या बहिणीची सुरक्षा करावीच लागेल. आपापल्या गावागावात, शहरात ‘बहीण सुरक्षित, घर सुरक्षित’ अशी स्वाक्षरी मोहीम घ्या. गावात मुख्य चौकात सार्वजनिक ठिकाणी स्वाक्षरी मोहिम राबवा. या स्वाक्षऱ्या उच्च न्यायालयाला पाठवू आणि हा बंद का करत होतो ते सांगू, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले. सरकार आरोपीना पाठिशी घालणार असेल तर आम्ही आवाज उचलणारच, असा एल्गार उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.
दरम्यान, न्यायालयाने ठरवले तर निर्णय घेऊ शकते. बंदला बंदी केली असली तरी राज्यातील प्रत्येक हृदयात तुमच्या विरोधात मशाल धगधगत आहे. महिलांना सुरक्षा पाहिजे, म्हणून बंद केला. त्यात अडथळा आणला. गेल्या आठवड्यात भारत बंद झाला. इतर राज्यात रेल्वेही बंद झाल्या होत्या. तेव्हा याचिकाकर्ते कुठे गेले होते. तेव्हा बंदला विरोध केला नाही, असा पलटवार उद्धव ठाकरेंनी केला.