मंदी आणि बेरोजगारीचे मूळ नोटबंदीच्या निर्णयात, 'सामना'तून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 08:15 AM2019-08-24T08:15:37+5:302019-08-24T08:21:43+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून नोटबंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.
मुंबई - देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये असतानाही केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार कुठलीही उपाययोजना करत नसल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने केली जाते. ऑटो क्षेत्रातील मंदी, हजारो नोकरदारांवर कोसळलेली बेरोजगारीची कुऱ्हाड, शेअर बाजारातील घसरण, डॉलरचा वधारलेला भाव या घडामोडींमुळे अर्थतज्ज्ञही चिंता व्यक्त करत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास भारताची अर्थव्यवस्था खूपच भक्कम आहे, इतर देशांच्या तुलनेत आपला विकासदरही आश्वासक आहे, असा दावा केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून नोटबंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.
मंदी आणि बेरोजगारीचे मूळ नोटबंदीच्या निर्णयात आहे. नोटबंदीत अनेकांचा काळा पैसा मोठ्या प्रमाणात पांढरा झाला हे मान्य केले पाहिजे, पण कोट्यवधी लोकांनी नोकऱ्या गमावल्या हे सुद्धा कटू सत्य आहेच असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. नोटबंदी ज्यांच्या कारकीर्दीत झाली ते अरुण जेटली दिल्लीच्या रुग्णालयात जीवन-मृत्यूशी संघर्ष करत आहेत व आणखी एक माजी अर्थमंत्री चिदंबरम हे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत, पण सीतारामन सांगतात हा भ्रष्टाचार नोटबंदीनंतरचा, म्हणजे गेल्या साडेतीन वर्षातला आहे. हा भ्रष्टाचार नक्की कोणत्या प्रकारचा, कोणी केला, त्यांच्यावर काय कारवाई केली याचे दाखले अर्थमंत्र्यांनी दिले असते तर बरे झाले असते असं देखील अग्रलेखात म्हटलं आहे.
लोकसभा सचिवालयाच्या अंतर्गत ‘नॅशनल इन्फोर्मेटिक्स सेंटर’आहे. या संस्थेने नोटाबंदीनंतरच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली आहे. सरकार अधिकारावर येताच एक एक घुसखोर पकडून बाहेर काढू या घोषणेप्रमाणेच भ्रष्टाचार निर्मूलनाच्या घोषणेचे काय झाले? विकासाचे स्वप्न कसे खोटे आहे ते परवा बिहारात दिसले. माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्र यांचे निधन झाले. सरकारी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. 21 तोफांची सलामी देण्याचा रिवाज त्यात आहे. पण सलामीस वर केलेल्या पोलिसांच्या बंदुकांतून एकही गोळी सुटली नाही. 21 बंदुकांचा ‘चाप’ दाबून पोलिसांची बोटे सुजली. आमची अर्थव्यवस्था त्या फसलेल्या तोफांच्या सलामीसारखीच झाली आहे. सीतारमण यांनी तेच सांगितले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सुरू आहेत काय? ते लवकरच दिसेल असं म्हणत शिवसेनेने अग्रलेखातून टीका केली आहे.