काँग्रेसला जे जमले नाही ते तुम्ही करून दाखवा, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 08:31 AM2018-11-20T08:31:08+5:302018-11-20T08:31:14+5:30

अमृतसर येथे रविवारी झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे.

Uddhav Thackeray slams PM Narendra Modi over bomb blast in amritsar | काँग्रेसला जे जमले नाही ते तुम्ही करून दाखवा, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोला

काँग्रेसला जे जमले नाही ते तुम्ही करून दाखवा, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोला

Next

मुंबई - अमृतसर येथे रविवारी (18 नोव्हेंबर) झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. ''सरकार फक्त निवडणुका जिंकण्यामागे लागले आहे. राज्यकर्ते निवडणूकग्रस्त झाले की प्रशासन, पोलीसही ढिले पडतात व त्यामुळे अतिरेक्यांचे फावते. कश्मीरात अशांतता आहेच, पण शांत झालेले पंजाब पुन्हा पेटू नये. निवडणुका येतील आणि जातील, पंजाबवरचा घाव हा देशावरचा घाव हे राज्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे. काँग्रेस पक्षाने गेल्या 70 वर्षांत काहीच केले नाही हे मोदींचे म्हणणे मान्य, पण पंजाबातील रक्तपाताकडे गांभीर्याने पहा इतकेच आम्हाला गंभीरतापूर्वक सांगायचे आहे'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे -
- कश्मीरमधील हिंसाचाराशी मुकाबला सुरू असतानाच आता पंजाबमध्येही पुन्हा दहशतवादी कारवाया सुरू झाल्या तर देशात अस्थिरता माजायला वेळ लागणार नाही. 
- पंजाब समस्येने हिंदुस्थानच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी लष्करप्रमुख अरुण कुमार वैद्य, माजी मुख्यमंत्री बिअंत सिंग यांच्यासह हजारो राजकारणी, पत्रकार, पोलीस, लष्कर व सामान्यांचे बळी घेतले.  
- देशाचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते की, पंजाबमध्ये पुन्हा बंडखोरीला हवा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पंजाब आज शांत असला तरी बाहेरून बंडखोरीस हवा देण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे आपल्याला सावध राहिले पाहिजे. लष्करप्रमुखांनी सावधानतेचा इशारा दिला, पण इशारा हवेत विरण्याआधीच अमृतसरला दहशतवादी हल्ला झाला. 
-  पंजाब कुणाला पेटवायचे आहे, या प्रश्नाचे उत्तर ‘पाकिस्तान’ असे आहे. पंजाब हल्ल्यामागे पाकिस्तानी ‘आयएसआय’ असल्याचा संशय पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केला. 
- देशात सध्या जे घडते आहे त्यास नेहरू-गांधी परिवार जबाबदार असल्याचे मोदी पुनः पुन्हा सांगत आहेत, पण सध्या तुम्हीच सत्तेवर आहात हे तुम्ही कसे विसरता? काँग्रेसला जे जमले नाही ते तुम्ही करून दाखवा.
- कश्मीरचा प्रश्न पेटलेला असताना आता पंजाबात बॉम्ब फुटू लागले हे कसले लक्षण मानायचे?  
- पंजाबातील हल्ल्यांमागे कश्मिरी अतिरेकी असू शकतात असे सांगितले जात आहे. ते कोणतेही अतिरेकी असोत, बळी आमच्या सामान्य जनतेचे जात आहेत. सरकार फक्त निवडणुका जिंकण्यामागे लागले आहे. राज्यकर्ते निवडणूकग्रस्त झाले की प्रशासन, पोलीसही ढिले पडतात व त्यामुळे अतिरेक्यांचे फावते. 
- कश्मीरात अशांतता आहेच, पण शांत झालेले पंजाब पुन्हा पेटू नये. निवडणुका येतील आणि जातील, पंजाबवरचा घाव हा देशावरचा घाव हे राज्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे. 
- काँग्रेस पक्षाने गेल्या 70 वर्षांत काहीच केले नाही हे मोदींचे म्हणणे मान्य, पण पंजाबातील रक्तपाताकडे गांभीर्याने पहा इतकेच आम्हाला गंभीरतापूर्वक सांगायचे आहे.

Web Title: Uddhav Thackeray slams PM Narendra Modi over bomb blast in amritsar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.