मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सामना संपादकीयमधून निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याची जोरदार चर्चा आहे. याच मुद्यावरुन उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ''पेट्रोल पंपांवर पंतप्रधान मोदींचे फोटो लावण्याची सक्ती होत असल्याचा आरोप होत आहे. या ‘फोटोसेशन’पेक्षा पेट्रोल पंपांवर ‘पेट्रोल–डिझेलचे दर स्थिर आहेत’ असे फलक लागतील हे पहा अन्यथा मोदींच्या फोटोसोबत त्यांच्या कारकीर्दीतील पेट्रोल–डिझेलच्या वाढत्या दरांचाही फलक लावा'', अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला आहे.
(१५ दिवसांत पेट्रोल-डिझेल तब्बल सात वेळा महागले)
- सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे- सध्या इंधन दरवाढीचा भडका होण्यामागे रुपयाचे अवमूल्यन हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.
- इंधनाचा समावेश ‘जीएसटी’मध्ये होणार नाही हे गेल्याच आठवडय़ात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलची ‘स्वस्ताई’ हे हिंदुस्थानात स्वप्नच ठरणार आहे.
- मुळात ज्यांनी ‘अच्छे दिन’चे स्वप्न विकून सत्ता प्राप्त केली त्या राज्यकर्त्यांची तशी मनापासून इच्छा आहे का? कारण पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त करण्याची, त्याला जीएसटीच्या कक्षेत घेण्याची मागणी झाली की कधी महसुली तोटय़ाचा बागुलबुवा उभा करायचा, कधी आंतरराष्ट्रीय इंधन दरांकडे बोट दाखवायचे तर कधी इंधनाच्या आयातीपोटी रिकाम्या होणाऱ्या गंगाजळीचा दाखला द्यायचा आणि त्याआड स्वतःचे ‘कर्तव्य’ लपवायचे असाच कारभार सुरू आहे.
- अच्छे दिनचे आणि महागाई कमी करण्याचे फुगे हवेत सोडणारे सरकार हे कर्तव्य कधी पार पाडणार आहे? महाराष्ट्रात आधीच्या शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे दर पाचही वर्षे स्थिर होते. सरकारने ठरवले म्हणून ते शक्य झाले होते.
- जनतेचा प्रधानसेवक म्हणवून घेणाऱ्यांच्या राज्यात निदान उरलेले काही महिने का होईना पण पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवणे, जनतेला जगण्याचे स्थैर्य देणे का शक्य नसावे? अच्छे दिनाचे सोडा, किमान जगण्याचे स्थैर्य तरी सामान्य माणसाला लाभू द्या.
- पेट्रोल पंपांवर पंतप्रधान मोदींचे फोटो लावण्याची सक्ती होत असल्याचा आरोप होत आहे. या ‘फोटोसेशन’पेक्षा पेट्रोल पंपांवर ‘पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत’ असे फलक लागतील हे पहा अन्यथा मोदींच्या फोटोसोबत त्यांच्या कारकीर्दीतील पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांचाही फलक लावा.