Uddhav Thackeray: ...म्हणून आमदारांना मोफत घरं देताय का? मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर मनसेचा तीव्र संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 10:50 AM2022-03-25T10:50:17+5:302022-03-25T10:56:43+5:30
मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना ही घरं देण्यात येतील. राज्याचा विषय मांडल्यानंतर कुठेतरी एक घर मिळावं, आमदार असेपर्यंत.. असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी झोपडपट्टी पुनर्विकास, बीडीडी चाळ, पत्रा चाळ यांचा उल्लेख करताना आमदारांसाठीही मुंबईत हक्काचं घर असणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच सर्वसामान्य लोकांचं झालं, आता लोकप्रतिनीधींचं काय? तर आपण जवळपास 300 आमदारांसाठी मुंबईत घरे देणार आहोत, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली. या घोषणेचं सभागृहातील आमदारांनी बाक वाजवून स्वागत केलं. मात्र, मनसेनं या निर्णयाला विरोध केला आहे. तसेच, आमदारांसाठी आमदार निवास असताना घरं कशासाठी? असा सवालही केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना ही घरं देण्यात येतील. राज्याचा विषय मांडल्यानंतर कुठेतरी एक घर मिळावं, आमदार असेपर्यंत.. असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. त्यानंतर, आमदारांना कायमस्वरुपी घरे आपण देत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केलं. यावरुन मनसेचे आमदार राजू पाटील यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. तर, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही हा खर्च कुणाच्या सांगण्यावरुन, असा सवालही त्यांनी विचारला आहे.
''मुळात हे कशासाठी हवंय? आमदार निवास उपलब्ध आहे. निवडून येणारे आमदार मुंबईत येतात तेव्हा त्यांची राहण्याची सोय होते. मग, ही मोफत घरं कशासाठी? राज्य सरकारच्या तिजोरीत पैशाचा खडखडाट आहे. शेतकऱ्यांना त्यांचे पैसे दिले जात नाहीत, वीज कापणी जोरात सुरू आहे. एसटी कर्मचारी पगार होत नसल्याने संपावर आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांचीही अशीच अवस्था आहे. पैसे नाहीत म्हणू नोकरभरती होत नाही, मग हा अवाढव्य खर्च नेमका कशासाठी आणि कुणाच्या सांगण्यावरून?'' असा सवाल संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
आमदारांना आमिष दाखविण्याचा प्रकार
''नेमकं सरकारला साध्य काय करायचंय? की तुमचं सरकार डळमळीत होतंय, म्हणून आमदारांना आमिष दाखवण्याचा हा प्रकार आहे? मुळात या प्रकाराची गरज काय? जनतेच्या पैशाच्या जीवावर मजा लुटणारे तुम्ही कोण? यासाठी सरकारने सार्वमत घेऊन लोकांच्या भावना जाणून घ्यायला हव्यात. त्यानंतरच यावर निर्णय घ्यावा. जनता सूज्ञ आहे. जनता नक्कीच याला विरोध करेल'', असेही देशपांडे यांनी म्हटले आहे.
मोफत घरांपेक्षा 200 युनिट वीज मोफत द्या
मनसेच्या आमदाराने ठाकरे सरकारला (Thackeray Government) 'कामाचा' सल्ला दिला आहे. राजू पाटील (MNS Raju Patil) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "आमदारांना मोफत घरे कशासाठी?" असं म्हणत निशाणा साधला. "आमदारांना मोफत घरे कशासाठी? घोषणा तुम्ही करता पण जनता आमदारांना लाखोली वाहत आहे. त्यापेक्षा सर्वसामान्यांना 200 युनिट मोफत वीज द्या व जनतेचे आशिर्वाद मिळवा" असं राजू पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.