मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज्यातील जनतेला संबोधित केल्यानंतर संध्याकाळी 'वर्षा' निवासस्थान सोडलं आणि 'मातोश्री' गाठलं. 'वर्षा' सोडत असताना शिवसैनिकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. याचाच उल्लेख करत काल पहिल्यांदा सामान्य शिवसैनिकाला वर्षावर प्रवेश मिळाला याचा आनंद असल्याचं सांगत शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना भावनिक पत्र लिहिलं आहे. या पत्रातून शिवसेनाआमदारांची विशेषत: मुंबईबाहेरील आमदारांच्या मनातील खदखद त्यांनी बोलून दाखवली.
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आता आमदार उघडपणे आपलं मत मांडू लागले आहेत. शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी आज थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तीन पानी पत्र लिहून पक्षातील नेत्यांवर खळबळजनक आरोप केले आहेत. तसेच, एकनाथ शिंदेंचा गट का तयार झाला, एकनाथ शिंदेंसोबत आम्ही का गेलो, हेही त्यांनी या पत्रातून सांगितले आहे. आमदार संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे लोकप्रतिनिथी आहेत.
आम्हीच एकनाथ शिंदेंना निर्णय घ्यायला लावला
आमचे हाल-अपेष्टा आम्ही सर्व आमदारांनी सहन केली. आमची व्यथा, आपल्या आजूबाजूच्या बडव्यांनी ऐकून घेण्याची कधी तसदीही घेतली नाही, किंबहुना आपल्यापर्यंत ती पोहोचवली सुद्धा जात नव्हती. मात्र, याचवेळी आम्हाला आदरणीय एकनाथ शिंदे यांचा दरवाजा उघडा होता. आणि मतदार संघात असलेली वाईट परिस्थिती, मतदार संघातील निधी, अधिकारी वर्ग, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत असलेला अपमान. आमची ही सर्व गाऱ्हाणी पक्षात फक्त शिंदेच ऐकत होते, आणि सकारात्मक मार्ग काढत होते. त्यामुळे आमच्या सर्व आमदारांच्या न्याय हक्कासाठी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर एकनाथजी शिंदेंना, आम्ही हा निर्णय घेण्यास घ्यायला लावला, असे संजय शिरसाट यांनी पत्रात लिहिले आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोकं तुम्हाला भेटत
जेंव्हा आम्हाला वर्षावर प्रवेश मिळत नव्हता तेंव्हा आमचे खरे विरोधक काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक तुम्हाला नियमित भेटत होते, मतदारसंघातली कामं करत होते. निधी मिळाल्याची पत्र नाचवत होते. भुमीपुजन आणि उद्घाटनं करत होते, तुमच्यासोबत काढलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल करत होते. त्यावेळी आमच्या मतदारसंघातले लोक विचारायचे की मुख्यमंत्री आपला आहे ना मग आपल्या विरोधकांना निधी कसा मिळतो?. त्यांची कामं कशी होतात? तुम्ही आम्हाला भेटतच नव्हता तर आम्ही मतदारांना उत्तर काय द्यायचं या विचाराने जीव कासावीस व्हायचा.
आम्हाला रामलल्लाचं दर्शन का नाही
हिंदुत्व, अयोध्या, राममंदीर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना? मग आता आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेंव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखलं? तुम्ही स्वत: फोन करुन अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका असे सांगितले. मुंबई विमानतळावरून अयोध्येला निघालेल्या मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांचे लगेज चेक इन झाले होते, आम्ही विमानात बसणार इतक्यात तुम्ही शिंदे साहेबांना फोन करून सांगितले की आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका आणि जे गेलेत त्यांना तुम्ही स्वत: परत घेऊन या. शिंदे साहेबांनी आम्हाला लगेच सांगितले की सीएम साहेबांचा फोन आला होता आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका. आम्ही मुंबई विमानतळावर चेक इन केलेले लगेज परत घेतले आणि आपले घर गाठले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकही मत फुटले नव्हते मग विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वास का दाखवला? आम्हाला रामलल्लांचं दर्शन का घेऊ दिले नाही?