Join us

"उद्धव ठाकरे बावचळलेल्या परिस्थितीतून बोलतात, सत्ता गेल्यानं संयम सुटला"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2022 12:09 PM

उध्दव ठाकरे जे लिहतात, किंवा त्यांच्या मनात जे आहे, ते सामन्यातून बाहेर येते. बावचळलेल्या परिस्थितीतून ते बोलतात

मुंबई - “कोणी कितीही अपशकुन करू द्या, महाराष्ट्रात शिवसेनेचाच भगवा फडकत राहील. आज मुंबईवर शिवसेनेचे राज्य आहे. तुमच्या छाताडावर बसून पुन्हा मुंबई जिंकूच. पुढील निवडणुकीत कमळाबाईंची अशी जिरणार आहे की, भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल,” असे म्हणत शिवसेनेने भाजपवर जोरदार निशाणा साधला. शिवसेनेनं सामनातू भाजपला लक्ष्य केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. 

उध्दव ठाकरे जे लिहतात, किंवा त्यांच्या मनात जे आहे, ते सामन्यातून बाहेर येते. बावचळलेल्या परिस्थितीतून ते बोलतात. सत्ता गेल्यामुळे त्यांचा संयम सुटला आहे. सत्ता गेल्यावर देखील संयम सोडायला नको. उध्दव ठाकरे हे सामनातून आपला संयम दाखवत आहेत. असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंनी सामनातून केलेल्या टिकेवर पलटवार केला आहे. तसेच, आज देखील उध्दव ठाकरेंची टोमणे सभा होणार असल्याचे म्हणत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर त्यांनी टिका केली. 

सामनातून भाजपवर बोचरी टीका

पुढच्या पिढीला कळणारदेखील नाही की, भाजप नावाचा एक पक्ष महाराष्ट्रात होता व तो महाराष्ट्राच्या मुळावर आला होता. ‘खोके’वाल्यांचा अधर्म या निष्ठेपुढे कसा टिकेल? जेथे धर्म तेथे जय! शिवतीर्थाच्या रणमैदानावर धर्म आहे! त्यामुळे जय नक्की आहे, असे म्हणत शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून भाजप आणि शिंदे गटावर टीकेचा बाण सोडला. 

विदर्भ वेगळा करण्याचे मनसुबे

देशात इतर नवी राज्ये निर्माण होतील तेव्हा विदर्भाचा लचका तोडू असेच मनसुबे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचे आहेत व त्यावर सत्तेतला ‘मिंधे’ गट गप्प बसला आहे. महाराष्ट्राची अखंडता, मुंबईची महाराष्ट्राशी असलेली नाळ तोडायची असेल तर आधी शिवसेनेची वज्रमूठ तोडावी लागेल. त्याशिवाय महाराष्ट्रातून मुंबईचा लचका तोडता येणार नाही हे माहीत असल्यानेच एका ठरलेल्या कारस्थानानुसारच मुंबई-महाराष्ट्रातील घटना वेगाने घडत असल्याचेही यात नमूद करण्यात आले.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशिवसेनाउद्धव ठाकरे