Uddhav Thackeray News: वक्फ बोर्ड, भाषा सक्ती यावरुन भांडणे लावायची आणि विधेयके संमत करावी, अशी कामे सरकार करत आहे. ज्या प्रमाणे शेतकरी रस्त्यावर उतरला, त्याप्रमाणे कामगार रस्त्यावर उतरला नाही. कोणीही एकत्र येता कामा नये हेच त्यांचे मिशन आहे. कोणालाही संघटित होऊ द्यायचे नाही, दबावाखाली ठेवायचे, चिंताग्रस्त ठेवायचे अन् आपले हित साध्य करून घ्यायचे, अशी त्यांची रणनीती सुरू आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.
आगामी मुंबईसह राज्यभरातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा सुरू झाल्या आहेत. राज ठाकरे यांच्याकडून पुन्हा एकदा राजकीय युतीसाठी हात पुढे केलेला हात आणि उद्धव ठाकरे यांचा प्रतिसाद यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. या घडामोडी सुरू असताना महाविकास आघाडीचे सरकार पडल्याबाबत उद्धव ठाकरे यांनी भाष्य करताना, त्यावेळेस काय घडले, हे सांगितले. भारतीय कामगार सेनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उद्धव ठाकरे बोलत होते.
...म्हणून त्यांनी माझे सरकार पाडले
अरविंद तुम्ही केंद्रीय मंत्री होता आणि मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा आपण काय-काय केले आणि काय-काय होऊ दिले नाही, त्या बद्दल सांगितले, हाच मुद्दा आहे. ज्या क्षणी माझ्या लक्षात आले की, दिल्लीला बसलेले दोन भाजपावाले फसवत आहेत. मी अरविंदला फोन केला. त्याला सांगितले की, राजीनामा द्यावा लागेल. त्यावर अरविंदने कशासाठी? माझे काय चुकले? असे न विचारता, येस सर बोलून राजीनामा देऊन आले. एक केंद्रीय मंत्री आपल्या मंत्रिमंडाळातून राजीनामा देत आहे, तर पंतप्रधान, पक्षाध्यक्षांना त्याला विचारावस वाटले नाही की, का राजीनामा देताय. इथे भाजपाच्या मनातल्या काळ्या गोष्टी उघड झाल्या. त्यांना अरविंद नको होता. अरविंदने राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ना अरविंदला थांबवले, ना मला फोन केला. मी विरोध केल्यामुळे मी असलेला कसा चालेल, कारण आम्हाला उद्योगपतींचे खिसे भरायचे आहेत. मग उद्धव ठाकरेंचे सरकार पाडा. म्हणून त्यांनी माझे सरकार पाडले. तुमचे सरकार पाडले. काळे कृत्य करून त्यांनी तुमच्या हक्काचे सरकार, या कारणाने पाडले, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.
दरम्यान, वक्फ बोर्ड विधेयकात गैर मुस्लीम व्यक्ती वक्फ बोर्डावर नियुक्ती करण्याची तरतूद होती. त्या तरतुदीला आमचा विरोध होता. आम्ही जो प्रश्न विचारला तोच प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला. गैर मुस्लीम लोक वक्फ बोर्डावर घेतले जातील, मग उद्या मंदिरांमध्ये गैर हिंदूंच्या नियुक्ती करणार नाही, याची काय खात्री आहे. आंधळेपणे आम्ही पाठिंबा देणार नाही. हिंदी बोलले म्हणजे हिंदू नाही. आम्ही मराठी बोलणारे कट्टर तुमच्यापेक्षा जास्त देशाभिमानी हिंदू आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.