Join us

“उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचे अधिवेशन सुरू होत आहे”; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 5:06 PM

Uddhav Thackeray News: पदवीधर मतदारसंघातील आमचे उमेदवार अनिल परब यांचा विजय आता उघड आहे, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.

Uddhav Thackeray News: लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन अखेरचे ठरू शकते, असे सांगितले जात आहे. लोकसभेतील यशानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला असून, अनेकविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या बैठकांचा सत्र सुरू झाले आहे. यातच विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे. या निवडणुकीत मतदान केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. 

मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यासाठी,  उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघात मतदान केले. पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबईतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार शिवसेनेच्या पाठिशी उभे राहतील याची मला खात्री आहे. पदवीधर मतदारसंघातील आमचे उमेदवार अनिल परब यांचा विजय आता उघड आहे, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.

उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचे अधिवेशन सुरू होत आहे

यावेळी पत्रकारांनी उद्यापासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाबाबत उद्धव ठाकरे यांना प्रतिक्रिया विचारली. यावर बोलताना, उद्यापासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होत आहे. महायुतीच्या खोके सरकारचे हे निरोपाचे अधिवेशन आहे. उद्या माध्यमांशी बोलताना राजकीय विषयाबाबत भूमिका मांडेन, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्यापासून होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने विरोधकांना चहापानांचे निमंत्रण देण्यात आले. मात्र, विरोधकांनी चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच होत असलेल्या विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा महायुती आणि मविआ असा संघर्ष पाहायला मिळत आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाकडून पत्रकार किरण शेलार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेना उबाठा गटाकडून माजी मंत्री अनिल परब यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले गेले आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेविधान परिषद निवडणूक 2024